ChatGPT : चॅट जीपीटी वापरावर लगाम, जाणून घ्या कसं करतं काम आणि बंदी घालण्यामागचं कारण
चॅट जीपीटी नेमकं आहे तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. इतकंच काय तर नोकरीवर गदा येणार का? अशी भीतीही काही जणांना सतावत आहे. काही देशांमध्ये तर चॅट जीपीटी वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चॅट जीपीटी हा शब्द तुमच्या कानावर पडला असेल. या शब्दामुळे तुमच्या मनात कुतुहूलही निर्माण झालं असेल. हे चॅट जीपीटी नेमकं कसं काम करतं आणि अनेक देशांमध्ये चॅट जीपीटी वापरावर बंदी घालण्याचं कारण काय? चॅट जीपीटी हे आर्टिफिशियल इंटेलीजेंस टूल आहे. एक जनरेटिव प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर भाषा मॉडेल असून एआयने विकसित केलं आहे. म्हणजेच गुगल सारखं एक दुसरं पोर्टल आहे असं म्हणायला हरकत नाही. याचा वापर नि:शुल्क आहे. यात 2021 पर्यंतचा डेटा फीड आहे.
सर्च बॉक्समध्ये लिहिलेले शब्द समजून न्यूज, लेख, कविता यासारख्या फॉर्मेटमध्ये उत्तर देऊ शकतो. पण व्यकरणाच्या दृष्टीने व्यवस्थित असेल की नाही ते मात्र अजूनही स्पष्ट नाही.त्याचबरोबर दिलेली माहिती रिचेक करण्याची आवश्यकता असते. पण भविष्यातील धोका ओळखून काही देशांनी चॅट जीपीटीवर बंदी घातली आहे. माणसांवर एआय हावी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
काही लोकांनी चॅट जीपीटीमुळे खासगी आयुष्य अडचणीत येईल अशी भीती व्यक्त केली आहे. म्हणजेच प्रायव्हसीच्या बाबतीत भविष्यात चॅट जीपीटीकडून धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे इटलीसह उत्तर कोरिया, इराण, रशिया आणि चीननं विविध कारणं पुढे करत ओपन एआयच्या एआय टूल वापरावर बंदी घातली आहे.
या देशात चॅट जीपीटीवर बंदी
चीन – अमेरिका या माध्यमातून चुकीची माहिती पसरवू शकते अशी भीती चीनने व्यक्त केली आहे. तसेच चुकीच्या माहितीमुळे जगात देशाची छबी खराब होऊ शकते. त्यामुळे विदेशी अॅप्लिकेशन आणि वेबसाईटच्या विरुद्ध असलेल्या नियम पुढे करत चीनने चॅट जीपीटीवर बंदी घातली आहे.
इराण – अणु करारावरून इराण आणि अमेरिकेतील संबंध यापूर्वी ताणले गेले आहेत. त्यामुळे इराण सरकार अनेक वेबसाईट्स आणि एक्सेसवर बारकाईने नजर ठेवून असते. त्यामुळे राजकीय स्थिती पाहता चॅट जीपीटीवर बंदी घालण्यात आली आहे.
रशिया – चॅट जीपीटीचा चुकीचा वापर होण्याची भीती रशियाने व्यक्त केली आहे. रशियाचे पश्चिमी देशांशी संबंध चांगले नाहीत. त्यामुळे चॅट जीपीटीमुळे यावर प्रभाव पडू शकतो. तसेच देशातील वातावरण गढूळ होऊ शकतं. त्यामुळे रशियात चॅट जीपीटी नाही.
उत्तर कोरिया – हुकूमशाह किम जोंग उनच्या हातात देशाची संपूर्ण सूत्र आहेत. त्यामुळे या देशात इंटरनेट वापरावरही बंधनं आहे. त्यामुळे चॅट जीपीटी वापरण्याचा प्रश्नच येत नाही.
सीरिया – या देशात इंटरनेट वापरासंबंधी कायदा आहे. इंटनेट ट्रॅफिकवरही सरकारचं नियंत्रणण आहे. यापूर्वी चुकीच्या माहितीमुळे देशाला मोठा फटका बसला होता. त्यामुळे चॅट जीपीटी वापरण्यावर बंदी आहे.
क्युबा – या देशातही सरकार इंटरनेट वापरावर सरकारचं नियंत्रण आहे. त्यामुळे चॅट जीपीटीसारख्या वेबसाईटवर बंदी आहे.