तुमच्या घरातही DTH आहे का? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या निर्देशानंतर दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने डीटीएचच्या सेट टॉप बॉक्ससाठी केवायसी ((DTH KYC)) करण्यासाठी शिफारस पत्र तयार केलंय.

नवी दिल्ली : तुम्ही आतापर्यंत बँक अकाऊंट आणि मोबाईल नंबरसाठी Know Your Customer म्हणजेच केवायसी प्रोसेस केली असेल. पण आता तुम्हाला डीटीएचसाठीही केवायसी (DTH KYC) करावी लागू शकते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या निर्देशानंतर दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने डीटीएचच्या सेट टॉप बॉक्ससाठी केवायसी (DTH KYC) करण्यासाठी शिफारस पत्र तयार केलंय.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ट्रायला 27 डिसेंबर 2018 रोजी एक पत्र पाठवलं होतं, ज्यात डीटीएचसाठी केवायसीची शिफारस केली होती. केवायसी प्रोसेसबाबत इतर गोष्टीही सांगण्यात आल्या होत्या. ग्राहकांनाही याबाबतचा सल्ला 19 ऑगस्टपर्यंत सरकारला देता येणार आहे. ग्राहकांचंही मत जाणून घेण्याचा याद्वारे प्रयत्न केला जातोय. तुम्ही या प्रक्रियेच्या विरोधात असाल तरीही 2 सप्टेंबरपर्यंत तुमचं मत नोंदवता येईल.
या सहा प्रश्नांसाठी तुमचं मत नोंदवा
डीटीएच सेट टॉप बॉक्ससाठी केवायसी करण्याची गरज आहे का?
केवायसी करण्यासाठी प्रक्रिया अवलंबली पाहिजे का?
डीटीएच इंस्टॉलेशनवेळी एकदाच केवायसी गरजेची आहे का? किंवा लोकेशन जाणून घेण्यासाठी ठराविक काळानंतर पुन्हा केवायसीची गरज आहे का? उत्तर हो असेल, तर किती दिवसानंतर केवायसी करायला हवी?
नवीन सेट टॉप बॉक्स घेताना सध्याच्या वापरातील सेट टॉप बॉक्सचीही केवायसी गरजेची आहे का? उत्तर हो असेल, तर सेट टॉप बॉक्सच्या केवायसीसाठी किती दिवसांचा वेळ द्यायला हवा?
तुमच्या सेट टॉप बॉक्सचं लोकेशन जाणून घेण्यासाठी यामध्ये स्थळ आधारित सेवा (एलबीएस) चा समावेश करावा का? यावर काही शुल्क आकारावं का?
डीटीएच सेट टॉप बॉक्स केवायसीबाबत इतर मुद्दे काय आहेत?