फेसबुकची मोठी घोषणा, युजर्सलाही पैसे कमावता येणार
सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म फेसबुक (Facebook) एक मोठी घोषणा केली आहे. त्या अंतर्गत आता युजर्सलाही पैसे मिळवता येणार आहेत. याचा लाभ घेण्यासाठी युजर्सचे वय मात्र किमान 18 पेक्षा अधिक असणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
नवी दिल्ली: सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म फेसबुक (Facebook) एक मोठी घोषणा केली आहे. त्या अंतर्गत आता युजर्सलाही पैसे मिळवता येणार आहेत. यासाठी युजर्सला एक अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी युजर्सचे वय मात्र किमान 18 पेक्षा अधिक असणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
फेसबुक संशोधनासाठी एक ‘रिसर्च अॅप’ (Research App) घेऊन आले आहे. फेसबुकने मंगळवारी याची घोषणा केली. हे अॅप डाऊनलोड करताना युजर्सला त्यांच्या फोनमधील विविध अॅपचा ते किती वापर करता याची माहिती गोळा करण्याची परवानगी संबंधित रिसर्च अॅपला द्यावी लागणार आहे. यानंतर हे अॅप युजर्सच्या फोनला ट्रॅक करुन कोण कोणते अॅप किती वेळ वापरतो याची माहिती संकलित करेल. याच्या बदल्यात फेसबुक युजर्सला पैसे देणार आहे. यावेळी फेसबुकने हेही स्पष्ट केले, की संबंधित अॅप केवळ 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले युजर्सच डाऊनलोड करु शकतात.
‘स्टडी बाय फेसबुक’ (Study by Facebook) नावाचे हे अॅप फोनमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर युजर्सद्वारे वापरण्यात येणाऱ्या फीचर, विविध अॅपवर खर्च केलेला वेळ, देश, डिव्हाईस आणि नेटवर्कच्या प्रकाराची माहिती संकलित करेल. या बाजारकेंद्री संशोधनातून युजर्सच्या आवडीनिवडीची माहिती मिळेल. त्याद्वारे फेसबुकला युजर्सला त्यांना आवडणाऱ्या गोष्टी उपलब्ध करुन देता येतील, असा दावा फेसबुकने केला आहे.
अॅप माहिती संकलनाची परवानगी घेणार
मागील काही वर्षांपासून फेसबुकच्या प्रायव्हसी पॉलिसीवर जगभरातून प्रश्न उपस्थित करण्यात आले. केंब्रिज अनालिटिका प्रकरणानंतर तर फेसबुकला कठोर टीकेला सामोरे जावे लागले होते. फेसबुकने सांगितले, हे अॅप युजर्सला केवळ इंस्टॉल होण्याआधीचीच नाही तर इंस्टॉल केल्यानंतरही या प्रोग्राम अंतर्गत जाणाऱ्या डाटाची माहिती देईल. या प्रोग्रामसाठी युजर्सची कमीत कमी माहिती घेतली जाईल. तसेच अॅपमधील मजकुराचा कोणतीही माहिती गोळा केली जाणार नाही.
यूजर्सला किती पैसे मिळणार?
या प्रोग्राम अंतर्गत अॅप डाऊनलोड करणाऱ्या युजर्सला किती पैसे मिळणार याची कोणतीही अधिकृत माहिती फेसबुककडून देण्यात आलेली नाही. मात्र, मागील वेळी अशाच प्रकारची योजना आणली तेव्हा फेसबुकने युजर्सला प्रति महिना 20 डॉलर दिले होते.
कोणत्या देशांमध्ये ही योजना सुरु होणार?
फेसबुकचे हे अॅप सुरुवातीच्या टप्प्यात अमेरिका आणि भारतात सुरु होणार आहे. फेसबुक या अॅपचे प्रमोशन करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचाही उपयोग करणार आहे. जाहिरात पाहून जे युजर्स या प्रोग्रामध्ये सहभागी होतील त्यांना अॅपवर साईनअप करावे लागेल. युजर्सची योग्यता तपासल्यानंतर फेसबुक अॅप डाऊनलोड करण्याची व्यवस्था करेल.