देसी ट्विटरला चिनी गुंतवणूकदाराचा रामराम, Koo आता पूर्णपणे भारतीय अॅप
Koo या अॅपमध्ये एका चिनी गुंतवणूकदाराने काही पैसे गुंतवले होते. परंतु त्यांनी आता यामधून काढता पाय घेतला आहे.
नवी दिल्ली : भारतीय मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कू (Koo) गेल्या काही महिन्यांपासून बरंच लोकप्रिय होत आहे. दरम्यान, अशी बातमी समोर आली होती की त्यात चिनी कंपनीची गुंतवणूक आहे, त्यामुळे या अॅपलाही बऱ्याच विरोधाचा सामना करावा लागला. दरम्यान, आता अशी बातमी समोर आली आहे की चिनी कंपनीची गुंतवणूक इतर गुंतवणूकदारांनी खरेदी केली आहे. त्यामुळे आता हे अॅप पूर्णपणे भारतीय आहे, असं म्हणता येईल. (Former Indian cricketer Javagal srinath, Flipkart CEO, bookmyshow head bought Chinese company stake in Koo app)
कू या अॅपची मालकी असणारी कंपनी बॉम्बिनेट टेक्नॉलॉजीजने माहिती दिली आहे की, त्यांच्या काही विद्यमान गुंतवणूकदारांनी आणि काही भारतीयांनी चीनमधील शुनवेई कॅपिटल या कंपनीची कू अॅपमधील हिस्सेदारी खरेदी केली आहे. शुनवेई कॅपिटलची हिस्सेदारी ज्यांनी खरेदी केली आहे त्यात माजी भारतीय क्रिकेटपटू जवागल श्रीनाथ, बुकमायशोचे संस्थापक आशिष हेमराजानी, उडानचे सह-संस्थापक सुजित कुमार, फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती आणि जेरोधाचे संस्थापक निखिल कामत यांचा समावेश आहे. कंपनीने सांगितले की, बॉम्बिनेट टेक्नॉलॉजीजमध्ये शुनवेई कॅपिटलचा कू अॅपमध्ये नऊ टक्क्यांहून अधिक हिस्सेदारी होती.
भारत सरकार VS ट्विटर वादाचा फायदा?
गेल्या महिन्यात रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्यासह अनेक मंत्र्यांनी ट्विटरचा स्वदेशी पर्याय Koo App मध्ये सहभागी होण्याबाबत ट्वीट केलं होतं. भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान कंटेंट सेन्सॉरशिपला घेऊन सरकार आणि ट्विटरमध्ये सुरु झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलल्याचे बोललं जात होतं. गेल्या वर्षी मार्चमध्ये लाँच झालेलं Koo हे अॅप भारतीय भाषांमध्ये ट्विटरप्रमाणे मायक्रोब्लॉगिंगचा अनुभव देतं.
अनेक सरकारी विभाग Koo वर अॅक्टिव्ह
त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय, काही सरकारी विभागांनी स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग साईट Koo वर आपलं खातं सुरु केलं आहे. काही ट्वीट आणि खात्यांवर निर्बंध लादण्याचे सरकारचे आदेश ट्विटरकडून पाळण्यात आले नव्हते. त्यामुळे सरकारने हे पाऊल उचलले. Koo ने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय, माय गाव, डिजिटल इंडिया, इंडिया पोस्ट, नॅशनल इन्फॉर्मेटिव्ह सेंटर (NIC), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉमन सर्व्हिस सेंटर, उमंग अॅप, डिजी लॉकर, नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाचे हँडल सुरु करण्यात आले आहे.
‘आत्मनिर्भर भारत’वर पूर्ण फोकस
गुगल प्ले स्टोर वर कू च्या डाउनलोडेड पेजवर या अॅपला ‘बिल्ट फॉर इंडियन्स’ असं म्हटलं आहे. यावर तुम्ही तुमच्या भाषेत तुमची मतं व्यक्त करु शकता. ‘कनेक्ट विथ इंडियन्स इन इंडियन लँग्वेजेस’ अशी कू ची टॅगलाईन आहे. हा एक पर्सनल अपडेट आणि ओपनियन शेयरिंग मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे.
Koo मध्ये काय खास?
भारतीय संदर्भाने Koo एक व्हॅल्यूएबल आणि पॉवरफूल प्लॅटफॉर्म आहे. हे App 10 महिन्यांपूर्वीच सुरु झालं आहे. या App ने गेल्या वर्षी सरकारचं आत्मनिर्भर चॅलेंज जिंकलं होतं. याचा उद्देश स्थानिक App विकास करणं हा होता. ट्विटरप्रमाणेच Koo युजर्सना लोकांना फॉलो करण्याची परवानगी देतं. हे App युजर्सना मॅसेज लिहिणं, तसंच ऑडिओ, व्हिडीओ फॉरमॅटमध्ये एकमेकांना पाठवण्याची परवानगी देतं. Koo वर भारतीय भाषांमध्ये विचार व्यक्त करण्याची सोय आहे.
इतर बातम्या
तुमचं Twitter Account अधिक सुरक्षित होणार, ट्विटरकडून नवं फीचर सादर
WhatsApp ला टक्कर देणारं Signal अॅप ‘या’ देशात कायमस्वरुपी बॅन
(Former Indian cricketer Javagal srinath, Flipkart CEO, bookmyshow head bought Chinese company stake in Koo app)