गुगलकडून 30 लाख अकाऊंट बंद, तुमच्या अकाऊंटचाही समावेश?
गुगलने गेल्यावर्षी आपल्या मॅप सेवेतून 30 लाखांपेक्षा अधिक व्यावसायीक अकाऊंट बंद केले आहेत. कंपनीच्या ब्लॉगनुसार या बोगस अकाऊंटद्वारे ग्राहकांची फसवणूक होऊ शकते.
मुंबई : गुगलने गेल्यावर्षी आपल्या मॅप सेवेतून 30 लाखांपेक्षा अधिक व्यावसायीक अकाऊंट बंद केले आहेत. कंपनीच्या ब्लॉगनुसार या बोगस अकाऊंटद्वारे ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. बऱ्याचदा हे व्यावसायीक फसवणूक करण्यासाठी स्थानिक पत्त्यानुसार लिस्टिंग करतात. गुगल लोकांना व्यवसायासोबत जोडण्यासाठी, संपर्क आणि त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी रस्ता दाखवण्याची सेवा देते.
मोफत सेवेचे पैसे
गुगल मॅप्सचे प्रोडक्ट डायरेक्टर ईथन रसेल यांनी नुकतेच एका ब्लॉगमध्ये म्हटले की, “बोगस व्यावसायीक मोफत गोष्टींसाठीही पैसे घेतात. ते स्वत:ला खरे व्यावसायीक सांगत ग्राहकांसोबत फसवणूक करतात. गुगल अशा टेक्नोलॉजीचा वापर करते ज्यामुळे आमच्या प्लॅटफॉर्मवर कुणाची फसवणूक होणार नाही”.
85 टक्के बोगस व्यावसायीक अकाऊंट बंद
रसेल म्हणाले, “गेल्यावर्षी आम्ही 30 लाखांपेक्षा अधिक बोगस अकाऊंट बंद केले होते. यामध्ये 90 टक्क्यांहून अधिक व्यापारी अकाऊंट असे होते की, ग्राहक ते ओपनही करु शकत नव्हते. या सर्व प्रक्रियेत 85 टक्के बोगस अकाऊंट अंतर्गत प्रणालीने बंद केले आहेत”.
“कंपनीने दुरुपयोग करणाऱ्या अशा अंदाजे दीड लाखांपेक्षा अधिक बोगस अकाऊंट बंद केले आहेत. जे 2017 पेक्षा 50 टक्के अधिक होते. कंपनी अशा बोगस अकाऊंटना हटवण्यासाठी नवीन पद्धतीवर काम करत आहे”, असंही रसेल म्हणाले.