मुंबई : देशात वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारतर्फे इलेक्ट्रॉनिक कार खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. याशिवाय अनेक कंपन्यांनीही इलेक्ट्रॉनिक बाईक आणि कार बाजारात लाँच केल्या आहेत. देशातील प्रसिद्ध होंडा (Honda) ऑटो कंपनी इलेक्ट्रॉनिक कारऐवजी हायब्रिड कार तयार करणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
देशात इलेक्ट्रॉनिक कारच्या चार्जिंगसाठी अनेक ठिकाणी चार्जिंग स्टेशन उपलब्ध नाहीत. चार्जिंग स्टेशनमध्ये वाढ होण्यासाठी बराच अवधी लागू शकतो असा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे कंपनीने इलेक्ट्रॉनिक कारऐवजी हायब्रिड कार बाजारात आणण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ऑटो एक्सपोमध्ये लाँच होण्याची शक्यता
पुढच्या वर्षी म्हणजेच 2020 रोजी ऑटो एक्सपो कार्यक्रमात होंडाची हायब्रिड कार लाँच करणार असल्याचे बोललं जात आहे. 2020 मध्ये कंपनी जपानमधील टोकियो मोटार शो आणि भारतात ऑटो एक्स्पो कार्यक्रमात कंपनी हायब्रिड कार अधिकृतपणे लाँच करणार आहे. यानंतर कंपनी होंडा सिटी कारही लाँच करणार असल्याचे म्हटलं जात आहे.
इंटेलिजेंट मल्टी मोड ड्राईव्ह टेक्नॉलॉजी
होंडाच्या या हायब्रिड कारमध्ये इंटेलिजेंट मल्टी मोड ड्राईव्ह (iMMD) टेक्नॉलॉजीचे फीचर असणार आहे. हे फीचर आतापर्यंत फ्लॅगशिप कार होंडा अकॉर्डमध्ये देण्यात आलेलं आहे. तर होंडाच्या हायब्रिड कार देण्यात येणारे हे फीचर आकाराने छोटे असेल. कंपनी ही नवीन कार साडे सहा लाख रुपयात लाँच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
1.5 लीटर टर्बोचार्ज डीझेल इंजिन
या कारमध्ये 1.5 लीटर टर्बोचार्ज डीझल इंजीन दिले जाऊ शकते. 2030 पर्यंत आमच्या कंपनीचे दोन तृतीयांश हिस्सा हा इलेक्ट्रॉनिक करायचा असल्याचे होंडाचे अध्यक्ष आणि डायरेक्टर हकीगो यांनी सांगितले.