हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल सहज सापडणार, केवळ ‘हा’ नंबर डायल करा!
हरवलेला किंवा चोरीला गेलेल्या मोबाईल शोध घेणं आता सोपं होणार आहे. मोदी सरकारने हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलच्या वाढत्या तक्रारींवर रामबाण उपाय शोधला आहे.
नवी दिल्ली : हरवलेला किंवा चोरीला गेलेल्या मोबाईल शोध घेणं आता सोपं होणार आहे. मोदी सरकारने हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलच्या वाढत्या तक्रारींवर रामबाण उपाय शोधला आहे. सरकारने देशभरात 14422 हा हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर तक्रारीसाठी पोलीस स्टेशनच्या चकरा मारण्याची गरज नाही. केवळ हेल्पलाईन नंबर डायल केल्यास तुमच्या तक्रारीची नोंद होईल आणि संबंधित यंत्रणा कामाला लागतील. त्यामुळे चोरी किंवा हरवलेला मोबाईल परत मिळवणं सोपं होईल.
सर्व मोबाईलचा डेटाबेस सांभाळणाऱ्या Central Idenity Register तयार करण्यात आलं आहे. दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद येत्या 1-2 आठवड्यात ही सेवा सुरु करु शकतात.
सेंट्रल आयडेंटीटी रजिस्टरमध्ये (CEIR) सर्व मोबाईलचा डेटाबेस असेल. महाराष्ट्र सर्कलमध्ये याची यशस्वी चाचणी झाली. त्यानंतर आता देशभर ही लागू करण्यात येणार आहे.
मोबाईल फोन कसा परत मिळू शकेल?
तुमचा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेल्यास 14422 हा हेल्पलाईन नंबर डाईल करा. नंबर डाईल केल्यानंतर पोलिसात तुमची तक्रार नोंद होईल आणि तुमच्या फोनचं नेटवर्क बंद होईल.
IMEI नंबर वरुन ऑपरेटर्स मोबाईलचं नेटवर्क ब्लॉक करु शकतील.
IMEI नंबर जर बदलला तरीही दुसऱ्या IMEI नंबरवरुनही मोबाईल ब्लॉक करता येईल.
IMEI नंबर बदलल्यास 3 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते.
दूरसंचार तंत्रज्ञान केंद्राने (सी-डॉट) चोरी किंवा हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी सेंट्रल इक्यूपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (सीईआयआर) तयार करण्यात आला आहे. सीईआयआरमध्ये देशातील प्रत्येक नागरिकाच्या मोबाईल मॉडेल, सिम नंबर आणि IMEI नंबरची नोंद आहे. IMEI नंबर मॅच करण्यासाठी सी डॉटने नवी प्रणाली मोबाई कंपन्यांच्या मदतीने बनवली आहे.
ही प्रणाली विविध राज्यांच्या पोलिसांकडे सोपवण्यात येईल. याशिवाय दूरसंचार कंपन्याही यामध्ये महत्त्वाच्या भूमिका निभावतील.
जर मोबाईलमधील IMEI नंबर बदलला असेल, तर मोबाईल कंपनी त्या सिमची सेवा बंद करेल. त्यानंतरही पोलिस तो मोबाईल ट्रॅक करु शकतील.
सी डॉटनुसार CEIR तंत्रामुळे तक्रार आल्यानंतर मोबाईलमध्ये कोणतंही सिमकार्ड घातलं तरी नेटवर्क येऊ शकणार नाही.
मात्र या तंत्रामुळे चोरलेल्या किंवा हरवलेल्या मोबाईलमध्ये कोणी सिमकार्ड घातलं, किंवा IMEI नंबर बदलला तर त्याची माहिती तातडीने मिळेल आणि तो मोबाईल ट्रॅकही केला जाऊ शकेल.
मोबाईलमधील नेटवर्क हे संबंधित सिमकार्ड कंपनीद्वारे ब्लॉक केलं जाईल.
जर कोणी दुसऱ्या मोबाईलचा IMEI चोरी किंवा हरवलेल्या मोबाईलमध्ये वापरला तर त्याचीही माहिती मिळेल.
IMEI नंबर बदलणे हा गुन्हा असून त्यासाठी तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. मोबाईल चोरी, हरवणे या घटना वाढल्याने दूरसंचार मंत्रालयाने याबाबत पावलं उचलली आहेत.