तुम्हाला व्हॉट्सअपवर कुणी ब्लॉक केलंय? इथं पाहा
तुमच्यावरच कधी ब्लॉक होण्याची वेळ आली आहे का? त्यावेळी तुम्ही ब्लॉक झाला आहात की नाही हे कसं पाहणार? याविषयीच्या या काही खास टिप्स.
नवी दिल्ली: इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने युजर्सला दिलेल्या अनेक सुविधांमुळे हे अॅप अल्पावधीतच लोकप्रिय झाले. यात मेसेजसोबतच फोटो आणि व्हिडीओही सहजपणे शेअरिंग करता येतात. तसेच वेळप्रसंगी त्रासदायक व्यक्तींना ‘ब्लॉक’ देखील करता येते. मात्र, तुमच्यावरच कधी ब्लॉक होण्याची वेळ आली आहे का? त्यावेळी तुम्ही ब्लॉक झाला आहात की नाही हे कसं पाहणार? याविषयीच्या या काही खास टिप्स.
ब्लॉक फिचरचा उपयोग करुन आपण आपल्याला नकोशा व्यक्तींना ब्लॉक करु शकतो. ब्लॉक केल्यानंतर त्या व्यक्तीचे मेसेज आपल्याला मिळत नाही. मात्र, जर आपल्यालाच ब्लॉक केलं तर ते कसं माहिती करुन घेणार हा मोठा प्रश्न आहे. खाली दिलेल्या महत्त्वाच्या टिप्सचा उपयोग करुन तुम्हाला या प्रश्नाचेही उत्तर शोधता येणार आहे.
मेसेज डिलिव्हरी टिक पाहा
व्हॉट्सअॅपवर ब्लॉकिंग नोटिफिकेशन्स येत नाही. त्यामुळे आपल्याला कुणी ब्लॉक केले हे समजत नाही. मात्र, मेसेज पाठवल्यानंतर येणाऱ्या डिलिव्हरी टिकवरुन तुम्हाला याची माहिती मिळू शकेल. यासाठी तुम्हाला संबंधित संपर्क क्रमांकावर एक मेसेज पाठवावा लागेल. मेसेज पाठवल्यानंतर मेसेजच्या खाली 2 टिक आल्या तर याचा अर्थ तुमचा मेसेज समोरच्या व्यक्तीला डिलिव्हर झाला आहे. म्हणजेच त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलेले नाही. मात्र, तुम्ही पाठवलेल्या मेसेजच्या खाली एकच टिक आली, तर त्याचा अर्थ तुम्हाला ब्लॉक करण्यात आले आहे. यात दुसरी शक्यताही आहे ती म्हणजे त्या व्यक्तीचे इंटरनेट कनेक्शन बंद देखील असू शकते. त्यामुळे या पद्धतीने निष्कर्ष काढताना काहीसा संयमही आवश्यक आहे. यासाठी तुम्ही अन्य व्हॉट्सअॅप क्रमांकावरुन मेसेज पाठवूनही याची खातरजमा करायला हवी.
संबंधित व्यक्तीचा प्रोफाईल फोटो पाहा
मेसेजशिवाय संबंधित व्यक्तीच्या प्रोफाईल फोटोवरुनही आपल्याला ब्लॉक केल्याची माहिती मिळू शकते. जर तुम्हाला कुणा व्यक्तीने ब्लॉक केले असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीचा प्रोफाईल फोटो किंवा स्टेटस पाहाता येणार नाही. व्हॉट्सअॅपवर तुम्हाला ब्लॉक करण्यात आले आहे की नाही हे पाहण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. प्रायव्हसी सेटींगनुसार प्रोफाईल फोटो कुणाला दिसायला हवा याची खास सेटिंग आहे. मात्र, तुम्हाला आधी प्रोफाईल फोटो दिसत असेल आणि आत्ता नाही, तर यावेळी तुम्ही ब्लॉक झाल्याची शक्यता सर्वाधिक आहे. दुसरी शक्यता त्या व्यक्तीने सेटिंग “Only Me” अशी करण्याची किंवा प्रोफाईल फोटोच न ठेवण्याचीही आहे. मात्र, त्याचे प्रमाण फार कमी आहे.
लास्ट सीन आणि ऑनलाईन ऑप्शन
आपण ब्लॉक झालो आहोत की नाही याची खातरजमा करण्यासाठी त्या व्यक्तीच्या चॅट विंडोवमध्ये जाऊन त्यांचा लास्ट सीन अथवा ऑनलाईन असल्याचे स्टेटस देखील पाहू शकता. जर तुम्हाला यापैकी काहीही दिसत नसेल, तर तुम्हाला ब्लॉक केल्याची शक्यता अधिक आहे. विशेष म्हणजे तुम्हाला आधी या दोन्ही गोष्टी दिसत असतील आणि अचानक दिसणे बंद झाले असेल तर तुम्ही ब्लॉक झाला आहात हे निश्चित.
व्हॉट्सअॅप कॉल करुन पाहा
जर तुम्ही ब्लॉक झाला असाल तर तुम्हाला त्या व्यक्तीला व्हॉट्सअॅप कॉल करता येत नाही. त्यामुळे तुम्ही अशा व्यक्तीला व्हॉट्सअॅप कॉल करुन पाहू शकता. जर कोणतीही रिंग वाजली नाही, तर त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे हे निश्चित होते. मात्र, रिंग वाजल्याचा आवाज आला तर त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलेले नाही हे स्पष्ट होते.
त्या व्यक्तीला ग्रुपमध्ये अॅड करुन पाहा
वरील सर्व टिप्सचा उपयोग करुनही तुम्हाला त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे की नाही हे समजत नसेल, तर शेवटी तुम्ही या टिपचा उपयोग करु शकता. यासाठी तुम्हाला ज्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केल्याचा संशय आहे त्याला कोणत्याही एका ग्रुपमध्ये अॅड करुन पाहा. जर तुम्हाला त्या व्यक्तीला ग्रुपमध्ये अॅड करता आले नाही तर तुम्ही ब्लॉक झाले आहात असा त्याचा अर्थ होईल. त्यात व्हॉट्सअॅपने युजर्सला नव्याने दिलेल्या फिचरचाही विचार करावा लागेल. व्हॉट्सअॅपच्या नव्या फिचरनुसार आपल्याला ग्रुपमध्ये कोण अॅड करु शकतो याची सेटिंग करता येते.