जिओची सेवा मंगळवारी दुपारी अचानक ठप्प झाली. त्यानंतर याविषयीच्या प्रतिक्रियांचा सोशल मीडियावर पूर आला. जिओची सेवा विस्कळीत झाल्याची माहिती समाज माध्यमांवर देण्यात आली. अनके युझर्सने कमेंट आणि मीम्स पोस्ट केल्या. त्यात जिओ डाऊन झाल्याची माहिती दिली. आऊटेज ट्रॅक करणारी साईट Downdetector ने सेवा विस्कळीत झाल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. अनेक ग्राहकांना सेवा ठप्प झाल्याचा फटका बसला आहे.
10 हजार तक्रारी
Downdetector वर एका तासात 10 हजार तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. ग्राहकांनी इंटरनेट, कॉलिंग ठप्प पडल्याचे म्हटले आहे. जिओची सेवा विस्कळीत झाल्याची ओरड तक्रारीत दिसली. यामधील 67 टक्के युझर्सने नो सिग्नल अशी तक्रार नोंदवली आहे. तर काहींनी इंटरनेट सेवा ठप्प झाल्याचे म्हटले आहे. तर 14 टक्के ग्राहकांनी ब्रॉडबँड सेवा Jio Fiber चा वापर करु शकत नसल्याची तक्रार केली आहे.
मुंबईला सर्वाधिक फटका
जिओची सेवा कोलमडल्याचा सर्वात जास्त परिणाम मुंबईत दिसून आला. यामुळे अनेक ग्राहकांना जिओच्या सेवेचा लाभ घेता येत नाहीये. एक्स प्लॅटफॉर्मवर अनेक युझर्सने जिओ सेवेविषयी पोस्ट आणि तक्रारी केल्या आहेत. एका युझरने Jio SIM आणि Jio Fiber सेवा चालत नसल्याचे म्हटले आहे. तर कंपनीकडून अद्याप याविषयी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
एक्सवर #jiodown ट्रेडिंग
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर Jio Down हा शब्द ट्रेंड होत आहे. एक्स प्लॅटफॉर्मवर #jiodown ट्रेडिंगमध्ये आहे. यावर अनेक मीम्स आणि कमेंटचा पाऊस पडला आहे. जिओ ही भारतातील सर्वात मोठी ग्राहक संख्या असलेली टेलिकॉम कंपनी आहे. तिची सेवा कोलमडल्याने ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आज गणपती विसर्जनाच्या दिवशी अनेकांना विसर्जनाचे फोटो, बाप्पासोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायचे होते. तर काहींना एकमेकांशी संपर्कात राहताना सुद्धा अडचणीत येत आहेत. सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहकांनी नाराजी आणि संतापाला सोशल मीडियावर वाट मोकळी करुन दिली आहे.