तुमचं मूलही सारखं फोनला चिकटतं का ? आजच सोडवा ही सवय अन्यथा पडेल भारी
मोबाईलचा अतिवापर हा मुलांसाठी अतिशय धोकादायक ठरू शकतो. अशा परिस्थितीत तुमच्या मुलांचे फोनचे व्यसन सोडवायचे असेल तर या टिप्स फॉलो करा.
नवी दिल्ली : आजच्या काळात मोबाईल (mobile) फोन हा सर्व लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. अशा स्थितीत पाहिले तर त्याचा सर्वाधिक परिणाम मुलांवर झाला आहे. आजच्या काळात, मुलं (kids) त्यांचा जास्तीत जास्त वेळ फोनवर घालवतात, मग तो अभ्यासासाठी असो किंवा गेम खेळण्यासाठी असो. मुलांचा मोबाईलचा वापर (excessive use of mobile by kids) वाढला आहे. मात्र अशा परिस्थिती अनेकवेळा पालक मुलांना अडवतात, नंतर अभ्यासाचे कारण सांगून मोबाईल वापरण्यापासून थांबवतात. पण मुलं काही बाहेर खेळायला जात नाहीत, घरातच राहतात.
तुमच्या घरातही अशीच परिस्थिती असेल आणि तुमच्या मुलांनी मोबाईल वापरणे सोडून बाहेर जाऊन मैदानी खेळ खेळावेत असे तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठी वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे. काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या मुलांची मोबाईलच्या अती वापराची वाईट सवय सोडवू शकता. त्यासाठी काय करावे ते जाणून घेऊया.
या टिप्स करा फॉलो
मुलांसमोर पालकांनीही फोन कमी वापरावा
लहान मुलं ही मातीच्या गोळ्यासारखी असतात असं म्हणतात. आपण त्यांना जे शिकवू ते लगेच शिकतात. मुलं ही अनुकरणप्रिय असतात. आपण जसं वागतो, ते पाहून मुलंही त्याचंच अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी जर तुम्ही त्यांच्यासमोर फोन जास्त वापरलात तर तेही तेच शिकतात आणि फोनमध्ये गुंतून राहतात. म्हणूनच मुलांची फोनची सवय अथवा व्यसन सोडवायचे असेल किंवा त्याचा वापर कमी करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्ही तुमचा फोनचा वापरही कमी केला पाहिजे. मोबाईल वर जास्त वेळ घालवणे बंद करा.
मुलांना थोडे खडसावून समजावून सांगा
काही वेळा पालकांच्या अतीप्रेमामुळे मुलांमधील भीती संपते. अशा वेळी जर तुम्ही त्यांना फक्त प्रेमाने नकार दिला तर ते तुमच्या बोलण्याकडे सरळ दुर्लक्ष करतात किंवा ते टाळतात. म्हणूनच मुलांशी अतिप्रेमाने वागणं बंद करा. प्रसंग आला तर त्यासाठी त्यांना ओरडून किंवा त्यांच्याशी कठोर वागलं पाहिजे. फोनची सवय त्यांच्यासाठी का वाईट आहे आणि त्यांचे किती नुकसान होत आहे, हे मुलांना वेळीच समजावून सांगितले पाहिजे. तरच त्यांची सवय सोडवणे शक्य होऊ शकेल.
मुलांना गरजेशिवाय फोन देणे टाळा
आजच्या काळात मुलंही खूप हुशार झाली आहेत. त्यांना माहीत आहे की आपण जरा रडून दाखवलं तर आई-बाबा लगेच फोन वापरायला अथवा गेम खेळायला देतील. पण अशा वेळी थोडं कडक धोरण स्वीकारणं गरजेचं आहे. मुलांच्या रडण्याकडे अथवा नखऱ्यांकडे दुर्लक्ष करा आणि गरज नसताना त्यांना फोन वापराला बिलकूल देऊ नका.
मुलांना इतर कामांत गुंतवा
तुमच्या मुलाने फोनचे व्यसन सोडावे असे वाटत असेल तर मुलांना इतर कामात व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. मुलांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करू द्या. त्यांना जास्तीत जास्त सर्जनशील आणि शारीरिक क्रियांमध्ये व्यस्त ठेवा. अशा परिस्थितीत, त्यांचे लक्ष त्यांच्या आवडीच्या गोष्टींकडे असल्याने मोबाईलचा वापर आपोआप कमी होईल.