इन्स्टाग्रामच्या 4 कोटी 90 लाख युजर्सचा डेटा लीक
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरील डाटा लीक होण्याचे प्रमाण वाढत आहे. फेसबुकवरील डेटा चोरीचे प्रकार समोर येत असताना आता इन्स्टाग्रामवरील डेटा लीक झाल्याचं समोर आलं आहे. ‘टेकक्रंच’ या वृत्तपत्राने याबाबतची माहिती दिली आहे. टेकक्रंचने दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामच्या जवळपास 4 कोटी 90 लाख युजर्सची माहिती लीक झाली आहे. यात अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी, राजकारणी, फूड […]
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरील डाटा लीक होण्याचे प्रमाण वाढत आहे. फेसबुकवरील डेटा चोरीचे प्रकार समोर येत असताना आता इन्स्टाग्रामवरील डेटा लीक झाल्याचं समोर आलं आहे. ‘टेकक्रंच’ या वृत्तपत्राने याबाबतची माहिती दिली आहे.
टेकक्रंचने दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामच्या जवळपास 4 कोटी 90 लाख युजर्सची माहिती लीक झाली आहे. यात अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी, राजकारणी, फूड ब्लॉगर यांसारख्या व्यक्तींचा समावेश आहे. या प्रसिद्ध व्यक्तींचे फॉलोवर्स, खाजगी माहिती, प्रोफाईल फोटो, फोन नंबर, ईमेल अकाऊंट यांसारख्या गोष्टी लीक झाल्या आहेत. धक्कादायक म्हणजे मुंबईतील एका सोशल मीडिया मार्केटिंग कंपनी ‘चॅटरबॉक्स’ने याबाबतची माहिती हॅक केल्याचं टेकक्रंचने म्हटलं आहे.
इन्स्टाग्रामने याबाबत चौकशी सुरु केली असून, थर्ड पार्टीद्वारे अशाप्रकारे डेटा हॅक करु शकतं का? याबाबतही तपास सुरु करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चॅटरबॉक्सकडे युजर्सचे फोन आणि ईमेलची माहिती नेमकी कशी पोहोचली? ती खरी आहे का? याबाबत सध्या चौकशी सुरु आहे. तसेच कोणतीही थर्ड पार्टी डेटा लीक करु शकते का? याबाबत सध्या टेक्निकल टीम तपास करत आहे. त्याशिवाय यापुढे डेटा लीक होऊ नये, यासाठी योग्य ती पावलं उचलली जाणार असल्याचंही इन्स्टाग्रामच्या प्रवक्त्तयांनी म्हटलं आहे.
चॅटरबॉक्स ही मुंबईतील एक वेब डेव्हलपमेंट कंपनी आहे. ही कंपनी सोशल मीडिया मार्केटिंगचे काम करते. दरम्यान या प्रकरणावर चॅटरबॉक्सने मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
गेल्यावर्षी फेसबुकच्या पाच कोटी युजर्सचा डेटा चोरी झाल्याचं उघडकीस आलं होतं. हा डेटा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूक मोहीमेत आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणानंतर फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी कठोर उपाययोजना करत डेटा हँकिंगच्या प्रकारला आळा घातला होता.