आता e-SIM चे युग, या बड्या कंपनीच्या सीईओंनी दिले संकेत
e-SIM | या आधुनिक जगात तंत्रज्ञान दिमतीला आल्याने अनके बदल होत आहे. e-SIM अशीच क्रांती घेऊन येण्याची शक्यता आहे. मोबाईलच्या खोबणीतील, स्लॉटमधील सिम कार्डची जागा हे नवं तंत्रज्ञान घेणार आहे. त्यामुळे सिम कार्डची गरज उरणार नाही. कोणत्याही झंझटीशिवाय ग्राहक या सेवेचा लाभ घेऊ शकतील. आहे तरी काय हे तंत्रज्ञान
नवी दिल्ली | 23 नोव्हेंबर 2023 : स्मार्टफोनपासून ते डाटा कनेक्टिव्हिटीपर्यंत सर्वच ठिकाणी सिम कार्डची गरज आहे. सिम कार्ड ही जणू ग्राहकांची ओळख आहे. त्याचा मोबाईल क्रमांक सिम कार्डमुळे मिळतो. हे तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यात सातत्याने नवनवीन प्रयोग सुरु आहेत. आता e-SIM ट्रेंड येणार आहे. मोबाईलच्या खोबणीतील सिमकार्डची ते जागा घेईल. त्यामुळे ग्राहकांना कोणत्याही सिम कार्डशिवाय कॉलिंग, एसएमएस, डाटा या सेवा मिळतील. त्यासाठी सिम कार्डची गरज संपेल. अर्थात लवकरच देशात e-SIM चे युग अवतरेल, अशी आशा एअरटेलचे सीईओ गोपाल विट्टल यांनी व्यक्त केली आहे.
ई-सिमबाबात दिले हे संकेत
दूरसंचार कंपनी एअरटेलचे सीईओ गोपाल विट्टल यांच्या मते सिम कार्डपेक्षा ई-सिम हा चांगला पर्याय ठरेल. अनेक स्मार्टफोन कंपन्या आणि डेटा डिव्हाईस निर्मिती कंपन्या याविषयीचा पर्याय देत आहेत. तर टेलिकॉम कंपन्या ई-सिमची ऑफर देत आहेत. ई-सिममुळे फोन चोरी झाल्यास डाटा ट्रान्सफर तर करता येईलच. पण या चोऱ्यांच्या प्रकारांना आळा बसेल.
चोरांना फटका
ई-सिमच्या वापरामुळे सिम कार्ड हरवण्याचे, चोरी होण्याची भीती संपते. चोरटे मोबाईवर हात साफ केल्यानंतर त्यातील सिम कार्ड फेकून देतात आणि चोरीचा मोबाईल काही तासातच देशातील दुसऱ्या कोपऱ्यातील शहरात विक्री होतो. पण आता ई-सिममुळे या फोनचे लोकेशन कळेल, तो ट्रॅक करणे सोपे होईल.
अनेक उपकरणांशी करता येईल जोडणी
ई-सिम सेवेमुळे सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे अनेक डिव्हाईसशी तुम्हाला एकाचवेळी एकाच क्रमांकावरुन जोडणी करता येईल. मोबाईल फोनपासून ते स्मार्टवॉचपर्यंत सर्व डिव्हाईस इंटरकनेक्ट करता येतील. ग्राहकांना सर्व दूरसंचार सेवा मिळतील. म्हणजे मोबाईलऐवजी तुम्हाला स्मार्टवॉचचा वापर करायचा आहे, अथवा इतर अनेक मोबाईलचा वापर करायचा असेल तर ई-सिम तुमच्या मदतीला येईल.
असा करा ई-सिमचा वापर
जर तुम्ही ई-सिमचा वापर करु इच्छित असाल तर सर्वात अगोदर फोनमध्ये तशी व्यवस्था आणि त्याची तशी क्षमता आहे का हे तपासा. जर तुमचा फोन ई-सिमला सपोर्ट करत असेल तर अगोदर टेलिकॉम ऑपरेटरशी संपर्क करावा लागेल. सध्या जिओ, Vi, एअरटेल ई-सिमचा पर्याय देत आहेत.