बंगळुरू : लवकरच आपण ऑफीसला उडत जाऊ शकणार आहोत. कारण लवकरच हवेत उडणारी टॅक्सी दाखल होणार आहे. त्यामुळे आपण आता ट्रॅफीकमध्ये अडकून पडण्याच्या कटकटीतून मुक्त होणार आहोत. या अनोख्या इलेक्ट्रीक एअर टॅक्सीला साल 2024 किंवा साल 2025 च्या सुरूवातीला लॉंच केले जाणार आहे. हवेत उडणारी ही (Electric Air Taxi) इलेक्ट्रीक टॅक्सी आहे तरी कशी ? केव्हापासून होणार आहे सुरू ? काय असणार आहे तिचे भाडे हे जाणू्न घेऊया …
आता ते दिवस दूर नाहीत जेव्हा आकाशात आपल्याला एअर टॅक्सी उडताना दिसतील. कारण बंगळुरू शहराच्या जवळ असलेल्या येलहंका वायू सेना स्टेशनमध्ये भरलेल्या एअरो इंडीया शोमध्ये इलेक्ट्रीक एअर टॅक्सीची झलक दाखवण्यात आली आहे. ही एअर टॅक्सी एकदम खास आहे. सध्या तिच्या चाचण्या सुरू आहेत. या अनोख्या इलेक्ट्रीक एअर टॅक्सीला साल 2024 किंवा साल 2025 च्या सुरूवातीला लॉंच केले जाणार आहे. आता पाहुयात काय आहेत या एअरो टॅक्सीची वैशिष्ट्ये …
देशातील ही पहिली इलेक्ट्रीक एअरो टॅक्सी असणार आहे. या टॅक्सीची खासियत म्हणजे तिला रनवेची गरजच लागणार नाही. कारण ही टॅक्सी व्हर्टीकली टेक ऑफ आणि लॅंडीग करणार आहे. या टॅक्सीतून दर तासी 160 किमीच्या वेगाने प्रवास करता येणार आहे. एअर टॅक्सीतून एका वेळी 200 किमी पर्यंतचा प्रवास करता येणार आहे. या टॅक्सीतून 200 किलोग्रॅमपर्यंतचे वजन वाहता येणार असल्याने पायलट शिवाय दोन अन्य लोक बसु शकणार आहेत. या टॅक्सीतून शहरातील लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने आण करण्याचे काम रस्ते मार्गाच्या तुलनेत दहा पट वेगाने होणार आहे. या टॅक्सीचे भाडे सध्या टॅक्सीच्या भाड्याच्या तुलनेत केवळ दोन ते तीन टक्के जास्त असणार आहे.
एअरो जेट सूटचे प्रदर्शन, माणूस हवेत उडणार
बंगळुरूच्या ‘एअरो इंडीया शो’ दरम्यान या टॅक्सीचे प्रदर्शन करण्यात आले आहे. तसेच या शोमध्ये एअरो जेट सूटचे प्रदर्शन करण्यात आले आहे. हा जेट सूट घातल्यानंतर माणूस जेट बनू शकतो आणि माणूसच थेट हवेत उडू शकतो. या जेट सुटमुळे माणसाला आता 50 ते60 किमीच्या वेगाने दहा किमीपर्यंत हवेतून प्रवास करता येईल. हा जेट सूट देशी तंत्रज्ञानातून बनविण्यात आला आहे. पंतप्रधानानी 13 फेब्रुवारीला या 14 व्या एअरो इंडीया – 2023 चे उद्घाटन केले आहे. यात शंभर देशांच्या सुमारे सातशे प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.