राज्यात 2019 ला सत्ताबदल झाल्यास अशोक चव्हाणच मुख्यमंत्री?
सुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची माहिती आहे. अशोक चव्हाण विधानसभा निवडणूकच लढवणार असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस आजपासून 48 जागांचा आढावा घेणार आहे. 2019 ला राज्यात सत्ताबदल झाल्यास काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अशोक चव्हाण असण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य शक्यतांमुळे अशोक चव्हाण विधानसभा निवडणूक लढवू शकतात. […]
सुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची माहिती आहे. अशोक चव्हाण विधानसभा निवडणूकच लढवणार असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस आजपासून 48 जागांचा आढावा घेणार आहे. 2019 ला राज्यात सत्ताबदल झाल्यास काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अशोक चव्हाण असण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य शक्यतांमुळे अशोक चव्हाण विधानसभा निवडणूक लढवू शकतात. राज्यात जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसने अशोक चव्हाण यांना नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकीला काँग्रेसचा चेहरा अशोक चव्हाण असणार यासाठी त्यांनी आता कंबर कसली आहे.
अशोक चव्हाण सध्या नांदेडचे खासदार आहेत. मोदी लाटेतही निवडून येणारे ते हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांच्यासह दुसरे खासदार आहेत. पण आता मुख्यमंत्रीपदासाठी अशोक चव्हाणांना राज्यात ठेवलं जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सध्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरु आहे. आघाडी करुन लढणार असल्याचं दोन्ही पक्षांनी याआधीच जाहीर केलं आहे. पण दोघांमध्ये मोठा भाऊ कोण आणि मुख्यमंत्रीपदाबाबत काय, हे दोन्ही पक्षांमध्ये अजून ठरलेलं नाही. हे सर्व ठरण्याअगोदरच काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचीही तयारी केली आहे.
काँग्रेसकडून राज्यात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सध्या जनसंघर्ष यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातून या यात्रेची सुरुवात झाली. विविध टप्प्यांमध्ये राज्यभरात ही जनसंघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेची जबाबदारी अशोक चव्हाणांकडे देण्यात आली आहे.
डिसेंबर 2008 ते नोव्हेंबर 2010 या काळात अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते. पण आदर्श घोटाळ्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.