भाजपच्या अनिल गोटेंनी दानवे, महाजनांची सभा उधळली
विशाल ठाकूर, टीव्ही 9 मराठी, धुळे: भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या धुळ्यातील सभेत भाजप कार्यकर्त्यांचा चांगलाच राडा पाहायला मिळाला. भाजपचे धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनीच हा राडा घातल्याचं समजतंय. धुळे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली होती. मात्र सभेत डावल्याचा आरोप करत भाजप आमदार अनिल गोटे यांनी गोंधळ घातला. यावेळी भरसभेत खुर्च्यांची […]
विशाल ठाकूर, टीव्ही 9 मराठी, धुळे: भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या धुळ्यातील सभेत भाजप कार्यकर्त्यांचा चांगलाच राडा पाहायला मिळाला. भाजपचे धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनीच हा राडा घातल्याचं समजतंय. धुळे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली होती. मात्र सभेत डावल्याचा आरोप करत भाजप आमदार अनिल गोटे यांनी गोंधळ घातला. यावेळी भरसभेत खुर्च्यांची फेका-फेकी झाली. भाजप आमदार अनिल गोटे यांनीच सभा उधळल्याने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना सभा आवरती घ्यावी लागली.
स्टेजवरुन शिवराळ भाषा वापरणारे हिरामण गवळी यांना गोटे यांनी स्टेजवर चढून लोकांसमोर थोबाडीत मारल्याचं सांगण्यात येत आहे.
गोटे स्टेजवर आले, त्यांचा फलकावर फोटो नव्हता शिवाय त्यांना निमंत्रणही नव्हतं. ते दानवेंशी रागाने काहीतरी बोलले, त्यावेळी गिरीश महाजन यांचे भाषण सुरु होते. महाजन भाषणात म्हणाले की मी अश्लील भाषण करत नाही, पत्रके काढत नाही, मी फक्त विकासावर बोलतो. मग त्यांनी कुठे कुठे कशा निवडणुका जिंकल्या ते सांगितलं. त्यांचे भाषण संपल्यावर गोटे उठले, त्यावेळी हिरामण गवळी यांनी आता प्रदेशाध्यक्ष भाषण करतील असे जाहीर केले. त्यावेळी गोटे माईकचा ताबा घेण्यास जात असताना त्यांना रोखण्यात आले. त्यावेळी स्टेजवर गोंधळ झाला पण शेवटी त्यांना खाली पाठविण्यात आले, नंतर दानवेंनी पूर्ण भाषण केले.
धुळे महापालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध गोटे यांचा लोकसंग्राम पक्ष अशी लढत होण्याची शक्यता आहे. भाजपने गोटे यांना डावलून महाजन यांना निवडणुकीचे सर्वाधिकार दिल्याने, गोटे चांगलेच नाराज आहेत.
इतकंच नाही तर गोटे आज सभा घेऊन महापौर पदाचा उमेदवार जाहीर करणार आहेत.
दानवे धारेवर
भुसावळ आणि जळगाव येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी खडसे यांना मंत्रिमंडळात का घेण्यात येत नाही ? या संदर्भात माहिती द्या अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. तब्बल अर्धा तास कार्यकर्त्यांनी दानवे यांना धारेवर धरले होते.