18 च्या किंमतीत 36 विमानं मिळतायत, गैरव्यवहाराचा संबंधच नाही : दसॉल्ट
पॅरिस : भारतात सध्या राफेल लढाऊ विमान खरेदीवरुन जो गदारोळ सुरु आहे, त्यावर फ्रान्सची एव्हिएशन कंपनी दसॉल्टने स्पष्टीकरण दिलं आहे. दसॉल्ट आणि रिलायन्स यांच्या संयुक्त प्रकल्पाबाबत दसॉल्टने खोटी माहिती दिली, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. पण ‘मी खोटं बोलत नाही’, असं म्हणत दसॉल्टचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी म्हटलं आहे. एएनआयला दिलेल्या […]
पॅरिस : भारतात सध्या राफेल लढाऊ विमान खरेदीवरुन जो गदारोळ सुरु आहे, त्यावर फ्रान्सची एव्हिएशन कंपनी दसॉल्टने स्पष्टीकरण दिलं आहे. दसॉल्ट आणि रिलायन्स यांच्या संयुक्त प्रकल्पाबाबत दसॉल्टने खोटी माहिती दिली, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. पण ‘मी खोटं बोलत नाही’, असं म्हणत दसॉल्टचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी म्हटलं आहे.
एएनआयला दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत एरिक ट्रॅपियर यांनी राफेलबाबत सर्व मुद्द्यांना उत्तरं दिली. ”मी खोटं बोलत नाही. यापूर्वी जे स्पष्टीकरण दिलं होतं, ते खरं आहे. खोटं बोलणारा अशी माझी प्रतिमा नाही. सीईओ म्हणून तुम्ही खोटं बोलू शकत नाही,” असं उत्तर ट्रॅपियर यांनी राहुल गांधींच्या आरोपावर दिलं. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपला ऑफसेट डील दिल्याचा व्यवहार दसॉल्ट लपवत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता.
राहुल गांधी यांनी 2 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली होती. “दसॉल्टने तोट्यात जात असलेल्या अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीत 284 कोटी रुपये गुंतवले आहेत. यातूनच रिलायन्स आता नागपुरात जमीन घेणार आहे. यातून स्पष्ट होतं, की दसॉल्टचे सीईओ खोटं बोलत आहेत. याची चौकशी झाली तर मोदी ती होऊ देणार नाहीत याची मी खात्री देतो,” असं राहुल गांधी म्हणाले होते.
आम्हाला काँग्रेससोबत व्यवहाराचाही अनुभव आहे, असं म्हणत ट्रॅपियर यांनी राहुल गांधींना इतिहासाची आठवण करुन दिली. ”आम्हाला काँग्रेससोबत मोठा अनुभव आहे. 1953 मध्ये आमचा पहिला व्यवहार पंडित जवाहरलाल नेहरु हे पंतप्रधान असताना झाला होता. आम्ही भारतासाठी काम करतो, कोणत्याही पक्षासाठी नाही. आम्ही फक्त लढाऊ विमानांसारख्या गोष्टी भारतीय वायूसेनेला आणि भारताला पुरवतो,” असं ट्रॅपियर म्हणाले.
संबंधित बातमी : राफेल करार कसा झाला? सरकारने सुप्रीम कोर्टात ए टू झेड सांगितलं!
कोणताही अनुभव नसलेल्या रिलायन्सचीच निवड का केली, या प्रश्नाचं उत्तरही ट्रॅपियर यांनी दिलं. जो पैसा आहे, तो थेट रिलायन्सला मिळणार नाही. हा रिलायन्स आणि दसॉल्टचा संयुक्त प्रकल्प आहे, असं ट्रॅपियर म्हणाले.
आम्ही रिलायन्समध्ये पैसा गुंतवत नाहीत. पैसा हा संयुक्त प्रकल्पामध्ये जाणार आहे. या प्रकल्पासाठी दसॉल्टचे इंजिनीअर आणि कामगार आहेत, जे आघाडीवर जाऊन काम करत आहेत. याचवेळी रिलायन्ससारखी कंपनी यामध्ये रस दाखवत आहे, कारण त्यांनाही त्यांच्या देशासाठी योगदान द्यायचं आहे आणि ही निर्मिती कशी केली जाते, ते शिकायचं आहे, असं ट्रॅपियर म्हणाले.
रिलायन्स आणि दसॉल्ट यांच्यात भागीदारी कशी असेल याबाबतही ट्रॅपियर यांनी माहिती दिली. रिलायन्सचा वाटा 49 टक्के, तर दसॉल्टचा वाटा 51 टक्के असेल, असं ते म्हणाले.
पहिल्यापेक्षा स्वस्तात विमानं मिळाली : ट्रॅपियर
”भारताला सध्याच्या करारानुसार जी विमानं मिळणार आहेत, ती अगोदरच्या तुलनेत नऊ टक्के स्वस्त आहेत. अगोदर म्हणजे यूपीए सरकारच्या काळात 18 विमाने खरेदी केली जाणार होती, ती यावेळी दुप्पट म्हणजे 36 आहेत. त्यामुळे याची किंमतही दुप्पट असायला हवी होती. पण हा सरकार ते सरकार निर्णय आहे. किंमत कमी करण्यात आली आहे. त्यामुळे भारताला नऊ टक्के कमी दराने 36 विमाने दिली जाणार आहेत,” अशी माहिती ट्रॅपियर यांनी दिली.
भारतीय कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला (HAL) वगळून रिलायन्स या खाजगी कंपनीला कंत्राट का देण्यात आलं यावरही ट्रॅपियर यांनी स्पष्टीकरण दिलं. ”126 विमानांचा करार होता, पण भारत सरकारला यातील 36 विमानं तातडीने हवी होती. त्यामुळे मी रिलायन्ससोबत काम करण्याचा निर्णय घेतला. शिवाय HAL ने अगोदरच सांगितलं होतं, की आम्ही ऑफसेट पार्टनर बनण्यासाठी उत्सुक नाही. त्यामुळे रिलायन्ससोबत जाणं हा माझा निर्णय होता,” असं ट्रॅपियर यांनी रिलायन्सला का निवडलं यावर सांगितलं.
”भारतात आणि टाटा आणि इतर काही कंपन्यांसोबतही चर्चा केली. 2011 मध्ये टाटा ग्रुपसोबतही चर्चा झाली होती. पण पुढे मी रिलायन्ससोबत जाण्याचा निर्णय घेतला, कारण, त्यांच्याकडे चांगल्या इंजिनीअरिंगचा अनुभव आहे,” असं ट्रॅपियर म्हणाले.
भारतात यावरुन राजकारण सुर झालंय हे मला समजलंय. निवडणुका जवळ आल्या की हे प्रत्येक देशात होतं. पण माझ्यासाठी सत्य महत्त्वाचं आहे आणि ते पारदर्शक असावं. भारतीय वायूसेना आमच्यासोबत खुश आहे, असंही ट्रॅपियर यांनी सांगितलं.
#Visuals: First look of the #Rafale jet for the Indian Air Force, from the Istre-Le Tube airbase in France pic.twitter.com/Qv4aJdgjI7
— ANI (@ANI) November 13, 2018
राफेलची पहिली डिलिव्हरी पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये होईल, असं ट्रॅपियर यांनी सांगितलं. कराराच्या वेळेनुसार काम होत असल्याचं ते म्हणाले.
VIDEO : एरिक ट्रॅपियर यांची संपूर्ण मुलाखत
#WATCH: ANI editor Smita Prakash interviews CEO Eric Trappier at the Dassault aviation hangar in Istre- Le Tube air… https://t.co/0igomqmE2i
— ANI (@ANI) November 13, 2018