सदानंद मोरेंचा राजीनामा घ्या, मराठा उपोषणकर्त्यांची मागणी
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत, असा आरोप आझाद मैदानात उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलकांनी केला. मराठा समाजाला आरक्षण द्या, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, सदानंद मोरे यांचा राजीनामा घ्या, अशा मागण्या यावेळी उपोषणकर्त्यांनी केल्या. आझाद मैदानात गेल्या 14 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे […]
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत, असा आरोप आझाद मैदानात उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलकांनी केला. मराठा समाजाला आरक्षण द्या, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, सदानंद मोरे यांचा राजीनामा घ्या, अशा मागण्या यावेळी उपोषणकर्त्यांनी केल्या. आझाद मैदानात गेल्या 14 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली.
फडणवीस सरकार आमचा छळ करत आहे. मेलो तरी मागे हटणार नाही. पुढे जे काही होईल त्याला सरकारने सामोरे जावे. मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत मराठा समाजाला दिशाहीन करण्याचं काम केले आहे. आतापर्यंत 42 मराठा आंदोलनकर्ते मेले. नाक दाबाल तर सरकारच तोंड उघडेल, असं यावेळी उपोषणकर्त्यांनी म्हटलं.
‘सदानंद मोरेंचा राजीनामा घ्या’
डॉ.सदानंद मोरे यांना सारथी संस्थेच्या अध्यक्षपदावरुन हटवा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
सारथी संस्था ऑगस्ट 2017 पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी लिहून दिलं होतं. आज दीड दोन वर्ष झालेत, त्याचं पालन झालं नाही. त्या संस्थेंचे नाममात्र अध्यक्ष सदानंद मोरे यांचा राजीनामा घेऊन, त्या ठिकाणी आयुक्तांची नेमणूक करावी. सारथी संस्थेचं अध्यक्षपद मंत्रिमंडळातील कोणीतरी करावी, अशी आमची ठोस मागणी आहे, असं उपोषणकर्त्यांनी सांगितलं
मुख्यमंत्री आनंद,जल्लोष करण्याची घोषणा करतात हे त्यांना शोभत नाही. मुंबईच्या बाहेर आंदोलन जावे यासाठी मुख्यमंत्र्यांची ही नवी चाल आहे. चंद्रकांत पाटील,विनोद तावडे, रणजीत पाटील हे दिशाभूल करत आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला.
‘मराठ्यांनो मुंबईत या’
नाक दाबाल तर तोंड उघडले, त्यासाठी महाराष्ट्रात अन्यत्र नव्हे तर मुंबईतच येऊन आंदोलन करा, कुठेही तोडफोड करु नका, आंदोलन भरकटवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे, हिंसा नको, अहिंसेने आंदोलन करु, असं यावेळी आवाहन केलं.
हिंसक आंदोलन आम्हाला करायचे नाही. सरकारला उद्या सकाळपर्यंतच अल्टिमेटम देत आहोत. सरकारने उद्या सकाळपर्यंत निर्णय घेतला नाही, तर पुढे जे होईल त्याला सरकार जबाबदार असेल. मुख्यमंत्र्यांनी आमच्या 3 मागण्यांची पूर्तता करावी. सरकारने आरक्षणाच्या नावाखाली मागण्यांकडे दुर्लश केले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच आरक्षणाची घोषणा करावी, असंही यावेळी उपोषणकर्त्यांनी नमूद केलं.
कोण आहेत डॉ. सदानंद मोरे?
महाराष्ट्राचे संतपरंपरेतील अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून अवघ्या महाराष्ट्राला डॉ. सदानंद मोरे परिचीत आहेत. मात्र, या ओळखीसोबतच डॉ. सदानंद मोरे यांनी महाराष्ट्राच्या विचारविश्वात स्वत: अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, प्रवचनकार, व्याख्याते, कीर्तनकार, संतसाहित्याचे गाढे अभ्यासक, इतिहास संशोधक अशा साहित्याच्या विविध क्षेत्रात डॉ. मोरे यांचा सहज वावर आहे. मराठी साहित्यात अत्यंत महत्त्वाचं मानल्या जाणाऱ्या पंजाबमधील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं आहे. शिवाय, 1996 साली प्रकाशित झालेल्या ‘तुकाराम दर्शन’ या त्यांच्या पुस्ताकाला ‘साहित्य अकादमी’ या साहित्यातील मानाच्या पुरस्कारानेही गौरव झाला आहे.
25 जून 1952 रोजी डॉ. सदानंद मोरे यांचा जन्म झाला. संत तुकाराम महाराजांची परंपरा लाभलेल्या घरात जन्म झाल्याने अर्थात लहानपणापासूनच डॉ. सदानंद मोरे यांच्यावर संत परंपरेचे संस्कार झाले. अत्यंत कुशाग्र बुद्धीचे असणाऱ्या डॉ. सदानंद मोरे यांनी ‘तत्त्वज्ञान’, ‘प्राचिन भारतीय संस्कृती आणि इतिहास’ या दोन विषयांत एमएम केले असून, ‘द गीता : अ थिअरी ऑफ ह्युमन अॅक्शन’ या विषयावर सखोल संशोधन करुन पीएचडी केली आहे. सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठी त्यांना ‘गुरुदेव दामले’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
साहित्य अकादमीसह मानाच्या विविध 15 संस्थांचे पुरस्कार त्यांच्या नावे आहेत. ‘उजळल्या दिशा’ या बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारलेल्या नाटकाला राज्य सरकारसह 10 पुरस्कारांनी गौरवलं आहे.
आशियाचं ऑक्स्फर्ड समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागाचे प्रमुख म्हणूनही डॉ. सदानंद मोरे यांनी काही काळ काम पाहिले. अत्यंत हुशार, संदर्भांची खाण, कुशाग्र बुद्धिमत्ता या जोरावर महाराष्ट्राच्या विचारविश्वात त्यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
‘लोकमान्य ते महात्मा’ हे त्यांचे पुस्तक वैचारिक लेखनातील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मराठीसह विविध भाषांमध्ये स्तंभलेखनही त्यांनी केले आहे.
सारथी संस्था
डॉ. सदानंद मोरे हे सध्या राज्य सरकारच्या ‘सारथी’ या संस्थेच्या अध्यक्षपदी आहेत. सारथी म्हणजे ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था’. मराठा समाजाला शिक्षण आणि रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार व्हावे या उद्देशाने ‘सारथी’ची स्थापना झाली. स्वयंरोजगार, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शिष्यवृत्ती, कौशल्य विकास इत्यादी विषयात सारथी सखोल काम करेल, असे संस्थेच्या स्थापनेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. पुणे बालचित्रवाणीच्या दुमजमली इमारतीतून ‘सारथी’चे काम चालते. मुंबई, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद आणि अमरावतीसह आठ जिल्ह्यात सारथीची कार्यलयं आहेत.