मराठा आरक्षण : आता आंदोलन नको, 1 डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री
कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : मराठा आरक्षणावर आंदोलन करु नका, आता एक डिसेंबरला थेट जल्लोष करा, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या घोषणेबाबत संकेत दिले आहेत. येत्या 15 दिवसात मराठा समाजाला आरक्षण देऊ, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूरमध्ये शेतकरी-वारकरी महासंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या महासंमेलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : मराठा आरक्षणावर आंदोलन करु नका, आता एक डिसेंबरला थेट जल्लोष करा, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या घोषणेबाबत संकेत दिले आहेत. येत्या 15 दिवसात मराठा समाजाला आरक्षण देऊ, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूरमध्ये शेतकरी-वारकरी महासंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या महासंमेलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातही वक्तव्य केलं. यावेळी व्यासपीठावर खासदार उदयनराजे भोसले, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री, गिरीश महाजन, पालकमंत्री राम शिंदे उपस्थित होते.
मुख्यमंत्री नेमके काय म्हणाले?
“आजच मागासवर्गीय आयोगाने अहवाला दिला. मराठा आरक्षणासाठी काहीजण श्रेयाची लढाई करत आहेत. पण काही लोकांना सांगायचंय की, श्रेयाची लढाई लढू नका. मात्र त्यांना हेही सांगायचंय की, आता आंदोलन करु नका, एक डिसेंबरला थेट जल्लोषच करा.”
मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर
मराठा आरक्षणाबाबतचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल महाराष्ट्राचे मुख्य सचिव डी के जैन यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती एम जी गायकवाड यांच्यासह सदस्यांनी हा अहवाल सादर केला. हा अहवाल तब्बल 20 हजार पानांचा आहे. या अहवालात नेमकं काय आहे, याबाबत आता सर्वांना उत्सुकता आहे. हा अहवाल येत्या 19 नोव्हेंबरला हायकोर्टात सादर केला जाणार आहे.
मराठा समाजाला किती टक्के आरक्षण द्यायचं? सरकारसमोर पेच
मागासवर्ग आयोगाने तयार केलेला मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. पण त्यानंतर राज्य सरकारची सर्वात मोठी अडचण म्हणजे मराठा समाजाला किती टक्के आरक्षण द्यायचं? कारण, मराठा समाजाला किती टक्के आरक्षण द्यायचं, याची शिफारस या अहवालात करण्यात आलेली नाही. टक्केवारीची शिफारस करण्यास मागासवर्ग आयोगाने नकार दिला आहे.
मराठा समाजाला किती टक्के आरक्षण द्यावं, यासाठी मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनीच शिफारस करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरुन केली होती. पण सदस्यांनी ही मागणी फेटाळल्याची माहिती टीव्ही9 मराठीच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी फोनवरुन विनंती केली होती. मराठा समाजाच्या मागासेलपणाबाबतच आयोगाची मर्यादा आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं. आरक्षणाबाबत टक्क्यांची आकडेवारी द्यावी यासाठी मुख्यमंत्री आग्रही होते. पण आयोगाने मुख्यमंत्र्यांची विनंती फेटाळली.
कुठल्या प्रकाराला किती गुण?
मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे की नाही, यासाठी काही बाबींचा अभ्यास केला. यात मराठा समाजात सामाजिक मागासलेपण किती आहे, यासाठी 10 गुण ठेवण्यात आले होते. आर्थिक मागासलेपणासाठी 7 गुण ठेवून अभ्यास करण्यात आला, तर मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे का, हेही तपासले गेले, यासाठी 8 गुण ठेवण्यात आले होते.
यात शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रकारात 8 पैकी 8 गुण मिळाले, मराठा समाजाला सामाजिक मागासलेपणात 10 पैकी 7.5 गुण मिळाले, तर आर्थिक मागासलेपणाला 7 पैकी 6 गुण मिळाले आहेत. 25 गुणांपैकी 21.5 गुण मागासवर्गीय आयोगाने दिले आहेत.
45 हजार कुटुंबांचं सर्वेक्षण
एक लाख 93 हजार सुनावणीच्या वेळी अर्ज आले. प्रत्येक जिल्ह्यातील एक तालुका आणि त्यातील पाच गावांमध्ये सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण केलं गेलं. 45 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण झालं. ओबीसीच्या इंडेक्सवर सर्वेक्षण करण्यात आलं. शहरी भागातील सर्वेक्षणही झाले. सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक अशा तीन प्रकारात प्रत्येक कुटुंबाला मागासवर्गीय आयोगाकडून प्रश्न विचारण्यात आले. मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचा निष्कर्ष मागास आयोगाने काढल्याची सूत्रांची माहिती असून, राज्य सरकारला अहवाल सादर करण्यात येणार आहे.