एल्गार परिषदेतील चिथावणीखोर भाषणांमुळे कोरेगाव भीमा हिंसाचार उफाळून आला : पुणे पोलीस
सागर आव्हाड, टीव्ही 9 मराठी, पुणे : एल्गार परिषदेत झालेल्या चिथावणीखोर भाषणांमुळे कोरेगाव भीमा हिंसाचार उफाळून आला, असा ठपका पुणे पोलिसांनी ठेवला आहे. कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या चौकशी आयोगासमोर पुणे शहर पोलिसांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात हा दावा करण्यात आलाय. एल्गार परिषदेत झालेल्या चिथावणीखोर भाषणांमुळे उपस्थितांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न […]
सागर आव्हाड, टीव्ही 9 मराठी, पुणे : एल्गार परिषदेत झालेल्या चिथावणीखोर भाषणांमुळे कोरेगाव भीमा हिंसाचार उफाळून आला, असा ठपका पुणे पोलिसांनी ठेवला आहे. कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या चौकशी आयोगासमोर पुणे शहर पोलिसांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात हा दावा करण्यात आलाय.
एल्गार परिषदेत झालेल्या चिथावणीखोर भाषणांमुळे उपस्थितांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला, असं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी पुणे शहर पोलिसांच्या वतीने शुक्रवारी चौकशी आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केलं. सेनगावकर यांच्या हद्दीत एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रतिज्ञापत्रात एल्गार परिषदेतील चिथावणीखोर भाषणं आणि त्या भाषणांविरोधात दाखल झालेल्या एफआयआरची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
या एफआयआरमध्ये कुणाचंही नाव घेतल्याचं अद्याप समोर आलेलं नाही. पण एल्गार परिषदेतील भाषणंच कोरेगाव भीमा हिंसाचाराला जबाबदारी होती, असा दावा पुणे पोलिसांनी केलाय. या हिंसाचाराचा तपास करताना पुणे पोलिसांनी देशभरात अटकसत्र सुरु केलं होतं, शिवाय काही जणांना अटकही करण्यात आली आहे.
कोरेगाव-भीमाच्या लढ्याला 200 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 31 डिंसेबर रोजी पुण्याच्या शनिवार वाड्यावर एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या कार्यक्रमानंतर 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा जवळच्या सणसवाडी परिसरात हिंसाचार उफाळून आला होता. एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वी कोरेगाव भीमा हिंसाचार चौकशी आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर करत, आपण कोणत्याही एखाद्या विशिष्ट संस्थेवर आरोप करण्याचा परिस्थितीत नाही अशी माहिती दिली होती. मात्र, राज्य सरकारने कोरेगाव भीमामध्ये योग्य ती सुरक्षेची व्यवस्था केली नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता.