राज ठाकरे आधी माफी मागा, मग मंचावर जा: निरुपम
मुंबई : ज्यांनी उत्तर भारतीयांना त्रास दिला, ज्यांना मारहाण केली, ते आता उत्तर भारतीयांच्या मंचावर जायचा प्रयत्न करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी त्यानंतर मंचावर जावं, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. राज ठाकरे उत्तर भारतीय महापंचायत संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी […]
मुंबई : ज्यांनी उत्तर भारतीयांना त्रास दिला, ज्यांना मारहाण केली, ते आता उत्तर भारतीयांच्या मंचावर जायचा प्रयत्न करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी त्यानंतर मंचावर जावं, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. राज ठाकरे उत्तर भारतीय महापंचायत संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली. राज ठाकरे यांनी हे निमंत्रण स्वीकारलं आहे. परप्रांतियांच्या मुंबईत येणाऱ्या लोंढ्यांवर नेहमीच आक्रमक भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर भारतीय मंचावर दिसणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातूनच संजय निरुपम यांनी आता राज ठाकरे यांनी मंचावर जाण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी केली आहे.
मुंबईतील कांदिवली इथे येत्या 2 डिसेंबर रोजी बुराभाई हॉलमध्ये उत्तर भारतीय महापंचायत संघाचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी उत्तर भारतीय महापंचायत संघाने राज ठाकरे यांना 12 ऑक्टोबर रोजी आमंत्रण दिलं होतं, जे त्यांनी स्वीकारलं. या कार्यक्रमात राज ठाकरे उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत. तसंच उत्तर भारतीयांसदर्भातील मत व्यक्त करणार आहेत.
परप्रांतातून मुंबईत येणारे लोंढे असो किंवा फेरीवाल्यांचा प्रश्न असो, मनसेने याविरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज ठाकरे या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. उत्तर भारतीयांवर नेहमीच सडकून टीका करणाऱ्या राज ठाकरेंनी हे निमंत्रण स्वीकारल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, यापूर्वीही राज ठाकरे यांनी जैन, गुजराती समाजाशी संवाद साधलेला आहे. उत्तर भारतीयांची मतं हा मुंबईत नेहमीच महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे. त्यामुळेच आता निवडणूक तोंडावर असताना राज ठाकरे आपली प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा प्रश्न उभा राहिला आहे.
संबंधित बातमी