भाजपला माज, अंबानींसाठी देश विकायला काढलाय: राज ठाकरे
मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील नरभक्षक अवनी वाघिणीला मारल्याप्रकरणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. उद्योजकांना फायदा पोहोचवण्यासाठी वाघिणीला मारलं जात असल्याचा आरोप करण्यात येतोय. पण अनिल अंबानींसाठी हा देश विकायला काढलाय का, असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला केला आहे. वाघिणीला मारण्याची काहीही गरज नव्हती. पण सरकारला सत्तेचा माज आला आहे. […]
मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील नरभक्षक अवनी वाघिणीला मारल्याप्रकरणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. उद्योजकांना फायदा पोहोचवण्यासाठी वाघिणीला मारलं जात असल्याचा आरोप करण्यात येतोय. पण अनिल अंबानींसाठी हा देश विकायला काढलाय का, असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला केला आहे.
वाघिणीला मारण्याची काहीही गरज नव्हती. पण सरकारला सत्तेचा माज आला आहे. घोडा मैदान दूर नाही, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.
सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री आहेत. उद्या मंत्रीपद जाऊ शकतं, पण आज जी जबाबदारी त्यांच्याकडे आहे, ती त्यांनी सांभाळणं आवश्यक आहे. पण ते बेफिकिरपणे उत्तर देतात, असं म्हणत राज ठाकरेंनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावरही निशाणा साधला.
वाघाचे पुतळे उभे करुन वाघ वाचत नसतात. आज अवनी वाघिणीला मारलं गेलं, तिच्या दोन बछड्यांचं काय, ते अजून सापडलेले नाहीत, अशी चिंताही राज ठाकरेंनी व्यक्त केली. गुजरातमध्ये गीर सिंहांच्या बाबतीत हे झालं असतं तर काय केलं असतं असा सवालही त्यांनी केला.
अवनीला वाचवण्यासाठी मोहीम
गेल्या जवळपास 47 दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यातील जंगलात ‘T1’ या नरभक्षक वाघिणीचा शोध घेतला जात होता. या वाघिणीचा अखेर खात्मा करण्यात यश आलं आहे. मात्र, ‘T1’ वाघिणीसाठी गेल्या काही दिवसांपासून प्राणीप्रेमींनी सोशल मीडियावर मोहीम राबवली होती. ‘अवनी’ असे या नरभक्षक वाघिणीला नाव देत, तिच्यासाठी राजकीय नेत्यांपासून अगदी बॉलिवूड कलाकारांपर्यंत सगळ्यांनीच अवनीला वाचवण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला होता
दुसरीकडे, यवतमाळमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दहशतीत वावरणाऱ्या ग्रामस्थांनी वाघिणीच्या खात्म्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. फटाके फोडत, मिठाई वाटत आपला आनंद गावकऱ्यांनी व्यक्त केला.
इटालियन श्वान ते गजराज… वाघिणीच्या खात्म्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा
भारताचे प्रसिद्ध गोल्फर ज्योती रंधावा हे सुद्धा त्यांचे प्रत्येकी 6 लाख किमतीचे केन कोर्स जातीचे दोन इटालियन श्वान घेऊन या भागात वाघीण जेरबंद करण्याच्या दृष्टीने दाखल झाले होते. मात्र, ते अयशस्वी ठरल्याने त्यांना परत पाठवण्यात आले. त्यानंतर मध्यप्रदेशातील कान्हा आणि महाराष्ट्रातील ताडोबामधून हत्तींनाही आणण्यात आले होते.
पवनपुत्र, विजय, हिमालय आणि शिवा, असे चार हत्ती मध्य प्रदेशातील कान्हा जंगलातून आणण्यात आले होते. हे चारही हत्ती भाऊ होते. एखाद्या वाघाला घेरुन त्याला जेरबंद करण्यात हे चार हत्ती पटाईत मानले जायचे. मात्र वाघीण हाती लागण्याच्या आतच या चार हत्तींची घरवापसी करण्यात आली. या हत्तींच्या घरवापसीला कारण ताडोबातील गजराज ठरला. गजराज साखळी तोडून पळाला आणि परिसरात नासधूस केली. शिवाय यात महिलेचा जीव गेला होता. त्यामुळे गजराजसह इतर चारह हत्तींनाही परत पाठवण्यात आलं होतं.