शिवसेना, बाबरी आणि 1992 चा रक्तरंजित इतिहास
पंकज दळवी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : रामाची जन्मभूमी अयोध्या आणि मुंबईचं जुनं नातं आहे. 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मशीद पाडल्यावर मुंबई पेटली. याचा आर्थिक आणि सामाजिक फटका मुंबईला बसला. बाळासाहेबांची राम मंदिराबाबतची भूमिका जगजाहीर होती. तिच भूमिका घेऊन आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 25 नोव्हेंबर रोजी अयोध्येत जाणार आहेत. काय आहे मुंबई आणि […]
पंकज दळवी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : रामाची जन्मभूमी अयोध्या आणि मुंबईचं जुनं नातं आहे. 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मशीद पाडल्यावर मुंबई पेटली. याचा आर्थिक आणि सामाजिक फटका मुंबईला बसला. बाळासाहेबांची राम मंदिराबाबतची भूमिका जगजाहीर होती. तिच भूमिका घेऊन आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 25 नोव्हेंबर रोजी अयोध्येत जाणार आहेत.
काय आहे मुंबई आणि अयोध्येचं नातं?
6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या वादग्रस्त जागी हजारोंच्या संख्येने कारसेवक जमा झाले होते. भाजपतर्फे उत्तर प्रदेश सरकारला लिहून देण्यात आलं होतं, की वादग्रस्त जागेबाहेर फक्त आंदोलन करु… मात्र तिथे काहीतरी वेगळचं घडलं.
कारसेवकांनी बाबरी मशीद पाडल्याच्या बातम्या आल्या. या एका बातमीने काही तासात संपूर्ण देशात वातावरण तापलं. अयोध्येपासून सुमारे दीड हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत रस्त्यावर दगड पडू लागले होते.
त्याचवेळी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मातोश्री’वरुन थेट भूमिका घेत बाबरी पाडल्याची जबाबदारी घेतली. तोपर्यंत संपूर्ण मुंबई पेटली होती. 6 डिसेंबर ते 12 डिसेंबर आणि 6 जानेवारी ते 20 जानेवारी या काळात मुंबईत जातीय दंगल पसरली.
मुंबई पेटली
6 डिसेंबर 1992 ला बाबरी मशीद पाडल्यावर मुंबई पेटली.
मुंबईतील पायधुणी, डोंगरी, अग्रिपाडा, गावदेवी, व्ही. पी रोड, भायखळा, भोईवाडा, नागपाडा, खेरवाडी, नेहरू नगर, कुर्ला, देवनार, ट्रॉम्बे, वांद्रा, वाकोला आणि जोगेश्वरी या भागांत दंगल पेटली.
जोगेश्वरीतील राधाबाई चाळ जाळण्यात आली
मुंबईत एकूण 900 लोकांचा या दंगलीत मृत्यू झाला
हजारो लोक या दंगलीत जखमी झाले, तर हजारो बेघर झाले.
मुंबईत दंगलीच्या वेळी शिवसेना प्रचंड आक्रमक झाली होती. शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’मधून शिवसैनिकांना आक्रमक होण्याचं थेट आवाहन करण्यात आलं आणि वातावरण अधिक तापलं. मात्र याचा सामाजिक आणि आर्थिक असा दुहेरी फटका मुंबईला बसला.
यावेळी मुंबईत शिवसेनेची मोठी ताकत समोर आली. शिवसैनिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. या दंगलीच्या चौकशीसाठी श्रीकृष्ण आयोग नेमण्यात आला. यात अनेक गोष्टी समोर आल्या. पण आता 26 वर्षांनी शिवसेनेची ती ताकत उरली नसल्याची टीका विश्व हिंदू परिषदेने केली आहे.
बाबरी पाडल्यानंतर मुंबईत ज्या प्रकारे दंगली उसळल्या, त्यावरुन अयोध्या आणि मुंबई यांचं नातं हे रक्तरंजित असल्याचं स्पष्ट होतं. अर्थात आता 26 वर्षांनी राजकीय आणि सामाजिक संदर्भ बदलले आहेत. त्यामुळे हा मुद्दा राजकीयदृष्ट्या किती महत्त्वाचा आहे हा राजकीय चर्चेचा विषय झालाय.