अमित शाह
अमित शाह यांचा जन्म मुंबईत 22 ऑक्टोबर 1964 मध्ये झाला. वयाच्या 16 व्या वर्षापर्यंत गुजरातमधील मानसा या गावी त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. त्यानंतर त्यांचं कुटुंब अहमदाबादमध्ये स्थायिक झालं. 80च्या दशकातच अमित शाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सामील झाले. नंतर भाजपच्या युवा मोर्चात त्यांनी काम सुरू केलं. लालकृष्ण आडवाणी यांच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातील जबाबदारी अमित शाह यांच्याकडेच असायची. 1997 मध्ये अमित शाह हे भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष झाले. त्याच वर्षी गुजरातच्या सरखेज विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत अमित शाह उभे राहिले आणि विजयी झाले. इथून त्यांचा संसदीय राजकारणाचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर ते सातत्याने विधानसभेवर निवडून आले. 2010 पर्यंत ते गुजरातच्या विधानसभेत होते. त्यानंतर त्यांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपदही त्यांच्याकडे आले. सध्या ते केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री आहेत. भाजपचे चाणक्य म्हणूनही त्यांची ओळख आहे.