जागतिक महिला दिन
जगभरातील महिलांच्या हक्काचा दिवस म्हणजे जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत अमेरिकेसहीत युरोपातील महिलांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला होता. या अन्यायाविरोधात महिलांचा संघर्ष सुरू होता. वस्त्रोद्योगातील हजारो कामगार महिलांनी न्यूयॉर्कमधील रुटगर्स चौकात ऐतिहासिक निदर्शने केली. तो दिवस होता 8 मार्च 1908. महिला कामगारांच्या या ऐतिहासिक लढ्याच्या स्मर्णार्थ 8 मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा, असा ठराव कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत करण्यात आला. क्लारा झेटकिन यांनी हा ठराव मांडला आणि तो मंजूर झाला. तेव्हापासून 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.