मोहाली | 15 नोव्हेंबर 2023 : चोरट्यांच्या धुमाकुळामुळे सामान्य नागरिक त्रस्त होतात. पण पंजाबमध्ये चोरीची अशी एक घटना घडली आहे, ज्यामुळ लोकं थक्क झाले आहेत. तिथे चोरट्यांनी पैसे, दागिने, मौल्यवान वस्तू यांच्यावर डल्ला मारलेला नाही, पण चोरीच्या या घटनेबद्दल ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. कारमधून आलेल्या दोन मुलींचे चोरीचे हे संपूर्ण कृत्य घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून ते आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ चर्चेत आहे. त्या व्हिडीओमध्ये जे दिसते त्यानुसार, सेडान कार घेऊन दोन मुली आल्या आणि खाली उतरल्या. इकडेतिकडे बघत कोणीही आपल्याला पहात तर नाही ना याची त्यांनी खात्री करून घेतली. आसपास कोणीच नाही याची खात्री पटल्यावर त्या मुली एक घराच्या मेन गेटजवळ आल्या आणि तेथे ठेवलेल्या झाडांच्या दोन कुंड्या चोरून तिथून निघून गेल्या. चोरीची ही अजबगजब घटना मोहाली सेक्टरच्या 78 मध्ये घडल्याची माहिती समोर आली आहे.
तो चोरीचा व्हिडीओ
Women found stealing flowerpots outside a home in Mohali, Punjab.pic.twitter.com/XGuXad4g8w
— The Purusharth 🌟 (@thepurusharth) November 14, 2023
कारमधून आल्या आणि कुंड्या घेऊन पळाल्या
आता हा व्हायरल व्हिडिओ पाहून नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आहेत. की एवढ्या सेडान कारमधून आलेल्या मुली झाडांच्या, फुलांच्या कुंड्या का चोरत असाव्यात, असाच प्रश्न सध्या सर्वांना पडला. पण त्या जिथे चोरी करत होत्या, त्या घराबाहेर सीसीटीव्ही लावले आहेत, याची त्यांना जराही कल्पनाच नव्हती. मात्र कुंडी चोरताना एका मुलीची नजर तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर पडली. त्यावर एका युजरने मजेशीर कमेंट केली.. ऊपरवाला सब देख रहा है. ( वरचा.. देव सगळं पाहतोय)
आधीही झाल्या अशा विचित्र चोरीच्या घटना
या वर्षी जानेवारी महिन्यात अशीच एक विचित्र चोरी झाली होती. जेव्हा दोन लोकांनी कथितरित्या दिल्ली-गुरुग्राम एक्स्प्रेस वेवरील एका मॉलसमोर ठेवलेली फुलांच्या कुंड्या चोरून आलिशान कारमध्ये ठेवल्या होत्या. ती चोरीही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. या प्रकरणी गुरुग्राममधील एका 50 वर्षीय व्यक्तीलाही अटक करण्यात आली.