Infosys : पत्नीकडून उधार घेऊन सुरू केली कंपनी, आज देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे इन्फोसिस
लंडनच्या हिथ्रो विमानतळावर सलवार-कमीज घातल्यामुळे सुधा मूर्ती यांना वर्णभेदाचा सामना करावा लागला होता.
नवी दिल्ली : देशातील प्रतिष्ठीत आयटी कंपनीमध्ये आज इन्फोसिस ( Infosys ) कंपनीचे नाव घेतले जाते. आयटी क्षेत्रात या कंपनीचा जगात खूप दबदबा आहे. आज या कंपनीत हजारो आयटी ( IT ) तज्ज्ञ काम करीत आहेत. आज कंपनीला उभारण्यासाठी किती मेहनत लागली हे ऐकून तुम्ही हैराण व्हाल. या कंपनीला केवळ सहा इंजिनियर मित्रांनी मिळून सुरू केले होते. आज ही कंपनी जगातील सर्वात मान्यताप्राप्त आयटी कंपनी असून देशभरात तिचे कर्मचारी काम करीत आहेत.
पत्नीकडून दहा हजार उधारीने घेतले होते…
इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांच्याकडून दहा हजार रूपये उधार मागून ही कंपनी सुरू केली होती. साल 1981 मध्ये नारायण मूर्ती यांनी आपल्या सहा इंजिनिअर मित्राच्या मदतीने मिळून या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली होती. नंतर हळूहळू या कंपनीने बाळसे धरले आज इन्फोसिस देशातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी बनली आहे. आणि नारायण मूर्ती यांचे नाव देशात प्रख्यात आहे. सुधा मूर्ती यांनी एका मुलाखतीत जेव्हा त्यांचे पती नारायण मूर्ती यांनी त्यांच्याकडे दहा हजार रूपये उधार मागितले तेव्हा त्यांना पुढे काय होईल हे माहिती नव्हते. परंतू माझ्या आईने मला सांगितले होते, नेहमी आपल्याकडे राखीव पैसे ठेवले पाहीजेत. त्यामुळे काही पैसे मिळाले की ते आपण बचत करून ठेवत असू, आईचा सल्ला आपल्या कामाला आला. साल 1999 मध्ये इन्फोसिस अमेरिकेचा शेअर बाजार Nasdaq नॅसडॅकमध्ये लीस्ट झाली आणि हा कारनामा करणारी ही पहिली भारतीय कंपनी ठरली.
सुधा मूर्ती यांना मिळाला पद्मभूषण
सुधा मूर्ती यांना देशाचा तिसरा सर्वात मोठा सन्मान पद्मभूषण देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांच्या सामाजिक योगदानासाठी त्यांना हा सन्मान भारत सरकारने दिला आहे. सुधा मूर्ती पुण्याच्या टेल्को कंपनीत काम करीत असताना त्यांची प्रसन्ना या सहकाऱ्यामुळे तेथेच काम करणाऱ्या नारायण मूर्ती यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांचा विवाह झाला सुधा मूर्ती या अंत्यत साध्या राहणीमानामुळे सर्वसामान्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
वर्णभेदाचा सामना करावा लागला
लंडनच्या हिथ्रो विमानतळावर सलवार-कमीज घातल्यामुळे सुधा मूर्ती यांना वर्णभेदाचा सामना करावा लागला होता. तुम्हाला इकॉनॉमी क्लासच्या रांगेत उभे रहायला हवे कारण तुम्ही कॅटल क्लास आहात असे तेथील एका प्रवाशाने त्यांच्याकडे पाहून म्हटले होते. सुधा मूर्ती यांच्या कपड्यावरून त्याला वाटले त्यांना इंग्रजी येत नसावे, त्यांनी हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला आहे. आज त्याच इग्लंडचे पंतप्रधान ऋषि सुनक त्यांचे जावई आहेत.