Holi 2023 : धावपळीतही जीवनाचा आनंद घेणारा मुंबईकर, लाईफलाइन लोकलमधील होळीचा व्हिडीओ व्हायरल
मुंबईकर त्यांच्या आवडत्या लोकलमध्ये सर्व सण साजरे करीत असतात. अगदी दसरा असो की दांडीया मुंबईकरांच्या सर्व सणांची सुरूवात त्यांच्या आवडत्या लोकलमधूनच करीत असतात.
मुंबई : कोणताही बिकट प्रसंग असो किंवा नैसर्गिक संकट मुंबईकर आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीला धावत असतो. नेहमी घड्याळ्याच्या काट्यावर धावणारा मुंबईकर धावपळीतही जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत असतो. तसेच आपले धकाधकीचे धावपळीचे आयुष्य विसरून प्रत्येक क्षण साजरा करीत असतो. अशाच प्रकारे होळीच्या सणाचाही मुंबईकर उपनगरीय लोकलमध्येही कसा आनंद लुटत याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला समाजमाध्यमावर खूप पाहिले जात आहे.
मुंबईकरांच्या लोकल ट्रेनमधील होळीचा व्हिडीओ डॉ. प्रशांत भामरे यांनी सोशल साईट ट्वीटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शनही छान लिहीली आहे. मुंबई स्पीरीट, कशाही परिस्थितीत असा आनंद घेता आला पाहिजे, हॅप्पी होळी ! अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. या व्हिडीओत प्रवासी हिंदी गाण्यांची एक प्रकारे अंताक्षरीच खेळताना दिसत आहे. सुन चंपा..सुन तारा या गीतावर प्रवासी आनंद घेत असून त्यांच्या गालाला आणि कपाळाला गुलाल लावल्याचे दिसत आहे. अगदी लोकलच्या पॅनलवरही हाताने आवाज काढीत ताल धरला जात आहे. सर्व प्रवासी या गाण्यांवर ठेका धरून नाचत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
मुंबईकर त्यांच्या आवडत्या लोकलमध्ये सर्व सण साजरे करीत असतात. अगदी दसरा असो की दांडीया मुंबईकरांच्या सर्व सणांची सुरूवात त्यांच्या आवडत्या लोकलमधूनच करीत असतात. दसऱ्याच्या सणाला लोकलच्या डब्यांना तोरणे लावली जात असतात. लांबपल्ल्याच्या गोदावरी एक्सप्रेसमध्ये मनमाडवासीय तर चक्क गणपती बाप्पाची स्थापना दरवर्षी करीत असतात.
हा पाहा व्हिडीओ..
मुंबई स्पिरिट, कश्याही परिस्थितीत असा आनंद घेता आला पाहिजे, हॅपी होळी ! pic.twitter.com/erqkKGJwGT
— Dr prashant bhamare (@dr_prashantsb) March 6, 2023
मुंबईची लोकल म्हणजे दररोज ७५ लाख प्रवाशांची वाहतूक करणारी मुंबईकरांची जीवन वाहिनीच म्हटली जाते. या लोकलमध्ये मुंबईकर त्यांच्या आयुष्यातील काही तास प्रवासात घालवत असतात. त्यामुळे रोजच्या प्रवासातील नेहमीचे प्रवासी त्यांचे सगे सोबती होतात. त्यांच्या सोबत आयुष्यातील सर्व सुखाचे आणि दु:खाचे क्षण ते दररोज एकमेकांशी शेअर करीत असतात, अशा मुंबईकरांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण दाखविणारा एक व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे.