Muslim Sanskrit : संस्कृत विषयात इरफानची कमाल! कमी गुण प्राप्त करुन पण टॉपर!
Muslim Sanskrit : देशात हिंदू-मुस्लीम असे धार्मिक ध्रुवीकरण सुरु असताना या मुस्लीम विद्यार्थ्याने संस्कृत विषयात इतिहास रचला आहे. तो संस्कृत विषयात टॉपर ठरला आहे.
नवी दिल्ली : देशात हिंदू-मुस्लीम असे धार्मिक ध्रुवीकरण सुरु असताना या मुस्लीम विद्यार्थ्याने संस्कृत विषयात इतिहास रचला आहे. तो संस्कृत विषयात टॉपर (Topper in Sanskrit) ठरला आहे. उत्तर प्रदेश माध्यमिक संस्कृत शिक्षा परिषदेने घेतलेल्या परीक्षेत त्याने इतिहास रचला. घरची हलाखीची परिस्थिती असताना या मुलाने केलेली कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श ठरली आहे. या विद्यार्थ्याचे नाव इरफान आहे. संस्कृतच्या उत्तर मध्यमा म्हणजे इंटरमीजिएट (Intermediate) परीक्षेत इरफानने 82.72 टक्के गुण प्राप्त केले. त्याला कमी गुण प्राप्त झाले असले तरी त्याने या इंटरमीजिएट परीक्षेत राज्यातून पहिला क्रमांक मिळवला आहे. त्याच्या या यशाची सध्या देशात चर्चा सुरु आहे.
संस्कृतमध्ये कमी गुण संस्कृतविषयात इरफानने 50 पैकी पहिल्या पेपरमध्ये 19 तर दुसऱ्या पेपरमध्ये 20 अंक प्राप्त केले. इतर विषयात त्याने चांगली गती दाखवली. साहित्य विषयात त्याला 93, भुगोल विषयात 97 यासह इतर विषयात पण त्याने चांगले गुण मिळवले. अकरावी आणि बारावीच्या एकूण 1400 गुणांपैकी त्याने 1158 गुण प्राप्त केले. त्याने संस्कृत शिक्षा परिषदेद्वारे घेतलेल्या या परिक्षेत संपूर्ण राज्यात पहिला क्रमांक पटकावला.
संस्कृतने तारले घरची परिस्थिती बिकट असतानाही इरफानने कमाल केली आहे. संस्कृत विषयाची इरफानला गोडी लागली आहे. तो चंदोली जिल्ह्यातील जिंदासपूर गावचा रहिवाशी आहे. घरात शिक्षणाचे वातावरण नसतानाही संस्कृत विषयात त्याने चांगली प्रगती केली आहे. संस्कृत हा विषय आवडत असून त्यात गोडी लागल्याचे त्याने सांगितले. संस्कृत समजण्यास अडचण येत असली तरी त्याने या विषयात गती मिळवली. या विषयाने त्याला तारले.
वडील करतात मोलमजूरी गावाजवळील प्रभुपूर येथील श्री संपूर्णानंद संस्कृत उत्तर माध्यमिक विद्यालयात इरफान शिक्षण घेत आहे. इरफान अत्यंत गरीब घरातील आहे. त्याचे वडील सलाउद्दीन मोलमजूरी करुन, शेतात राब राब राबून इरफानला शिकवतात. इरफान हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. इरफानच्या या यशाबद्दल त्यांचा उर भरुन आला. जणू त्यांच्या मेहनतीचं चीज झालं. इरफानच्या शाळेच्या शिक्षकांन तर त्याचे विशेष कौतुक आहे. त्याने संस्कृत विषयासाठी खूप मेहनत घेतल्याचे सांगत, त्याच्या या यशाबद्दल त्यांना अभिमान आहे. इरफानला पुढे जाऊन शिक्षक व्हायचं आहे. संस्कृत विषयाची इरफानला गोडी लागली आहे. पण त्याला संस्कृत विषयात आणखी प्राविण्य मिळविण्याची इच्छा आहे. त्याला कमी गुणांचा शिक्का पुसून काढायचा आहे.