मार्कशीटसाठी प्रभू श्रीरामाला पत्र; उडाली एकच खळबळ, या विद्यापीठाच्या विद्यार्थ्याने का निवडला हा मार्ग?
Student Letter to Prabhu Ram for Marksheet : विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका एका विद्यार्थ्याला बसला. उंबरठे झिजवूनही न्याय मिळत नसल्याने या विद्यार्थ्याने गुणपत्रिकेसाठी थेट देवालाच साकडे घातले. त्याची देशभरात चर्चा होत आहे.

शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, विद्यापीठातील कारभार हा राम भरोसे आहे, असे आपण अनेकदा ऐकतो. परीक्षा घोटाळे, पेपर फुटी, बोगस पदव्या अशा एक ना अनेक मुद्यांनी शैक्षणिक सत्र बदनाम झाले आहे. असाच विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका एका विद्यार्थ्याला बसला. उंबरठे झिजवूनही न्याय मिळत नसल्याने या विद्यार्थ्याने गुणपत्रिकेसाठी थेट देवालाच साकडे घातले. त्याची देशभरात चर्चा होत आहे.
प्रभू श्रीरामाला पत्र
आगरा येथील डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठातील गलथान कारभार समोर आला आहे. विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून या विद्यार्थ्याने प्रभू श्रीरामाला पत्र लिहिले. त्यात विद्यापीठाची आणि कर्मचाऱ्यांची तक्रार केली. आशिष प्रिंस या विद्यार्थ्याने हे पत्र लिहिले आहे. त्याने योग या विषयात पदव्युत्तर पदवी (MA) करत आहे. पण विद्यापीठाने त्याला दोन महिन्यांपासून गुणपत्रिकाच दिली नाही. अखेर वैतागून त्याने प्रभू श्रीरामालाच पत्र लिहिले. ते पत्र व्हायरल झाले आहे.




चूक विद्यापीठाची पण फटका विद्यार्थ्याला
आशिष प्रिंसला केवळ एका सेमिस्टरची गुणपत्रिका देण्यात आली असे नाही तर दुसरे, तिसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टरची पण गुणपत्रिका देण्यात आलेली नाही. त्यामुळे तो जाम वैतागला आहे. विद्यापीठाने त्याचा आसन क्रमांकात काही तरी चूक केली आणि त्याचा फटका त्याला बसला. त्याने गुणपत्रिकेसाठी अनेकदा विद्यापीठाशी संपर्क केला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. IGRS Portal वर त्याने तक्रार सुद्धा दाखल केली आहे. पण त्यावरही निर्णय झाला नाही.
थेट प्रभू श्रीरामाला पत्र
अनेकदा तक्रार करुनही काहीच उपयोग होत नसल्याने त्याने थेट प्रभू श्रीरामाला पत्र लिहिले. ‘हे देवा, मी आपल्याकडे प्रार्थना करतो की, माझी गुणपत्रिका मला मिळवून द्यावी.’ अशी विनंती त्याने पत्रात केली आहे. त्याने पोस्टाद्वारे हे पत्र प्रभू श्रीरामाला पाठवले आहे. त्याचे पत्र समाज माध्यमात चर्चेचा विषय ठरलेले आहे. आता देवच आपल्याला न्याय देऊ शकतो, अशी प्रतिक्रिया आशिष प्रिंसने दिली आहे.