Husband Wife Meet: अमरावतीचे वीर-ज़ारा! तब्बल 32 वर्षा नंतर पती पत्नीची भेट, खरंखुरं म्हणायचं का सिनेमा म्हणायचा?
Husband Wife Meet: तुम्हाला विश्वास बसणार नाही पण तब्बल 32 वर्षांनंतर पती पत्नीची भेट झालीये. किस्सा आहे आपल्याच महाराष्ट्रातील अमरावतीचा!
अमरावती: एक वीर-ज़ारा (VeerZara Cinema) नावाचा प्रीती झिंटा आणि शाहरुखचा सिनेमा आला होता. प्रेक्षकांनी या सिनेमाला भरभरून प्रेम दिलं होतं. आजही हा सिनेमा सगळ्यांच्या स्मरणात आहे, आजही प्रेक्षक तो आवडीनं पाहतात. या सिनेमात शाहरुख आणि प्रीती झिंटा एकमेकांवर प्रचंड प्रेम करत असतात पुढे सगळं सिनेमा तर तुम्हाला तोंडपाठ असेलच त्यांचं लग्न होतं आणि मग काही करणास्तव बरीच वर्ष ते एकमेकांपासून लांब असतात. शेवटी त्यांचं प्रेमावर असणारा विश्वास आणि त्यांचं नशीब त्यांना बऱ्याच बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकत्र घेऊन येतं. असाच किस्सा झालाय महाराष्ट्रात. होय! तुम्हाला विश्वास बसणार नाही पण तब्बल 32 वर्षांनंतर पती पत्नीची भेट (Husband Wife Meet) झालीये. किस्सा आहे आपल्याच महाराष्ट्रातील अमरावतीचा (Amravati)!
घरच्यांनी तो पुन्हा मिळेल याची आशा सोडली होती
शेषराव काळे, वय 60 वर्ष, रा. नेकनापुर हा इसम जवळपास 32 वर्षा पूर्वी मेंदुवर परिणाम झाल्याने कोणाला काही ही न सांगता घर सोडुन निघून गेला होता. त्या वेळेस नातेवाईकांनी भरपूर शोध घेतला पोलीसांना माहिती दिली. मात्र ते तेव्हा सापडले नाहीत मग घरच्यांनी तो पुन्हा मिळेल याची आशा सोडली होती.तिकडे पुंडलिक हा भटकत भटकत थेट केरळ या राज्यात पोहचला. कोणी देईल ते खाऊन व जागा मिळेल तिथे झोपत होता. सुमारे 18 वर्षांपूर्वी एर्नाकुलम, केरळ येथील दिव्य करूणा ट्रस्ट च्या स्वयंसेवकांची नजर त्याच्यावर पडली. त्यांनी त्यास त्यांचे आश्रमात नेऊन त्यांच्यावर तब्बल 18 वर्ष उपचार केले. मागील महिन्यात त्याला पूर्ण घटनाक्रम आठवला व त्याने त्याचे नाव व पत्ता स्वंयसेवकांना सांगितला सदर ट्रस्ट ने 15 दिवसांपूर्वी चांदुर रेल्वे येथील ठाणेदार विलास कुलकर्णी यांचे शी संपर्क साधून सदर इसमाची ओळख पटवली.
संपूर्ण गाव स्वागतासाठी सज्ज
त्या वरून ट्रस्ट स्वंयसेवक टोनी पालीकर, श्रिमती बिंदु व श्रिमती बिना कांजुर हे एर्नाकुलम केरळ ते चांदुर रेल्वे पर्यंत सतत संपर्कात राहून आज सकाळी पुंडलिक शेषराव काळे यांना घेऊन चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनला पोहचले. याबाबत नेकनानपुर येथील पुंडलिक यांचे नातेवाईकांना माहिती देण्यात आली. पुंडलिक काळे यांना घेवुन पोलीसांचा ताफा गावात पोहचला, त्या वेळी संपूर्ण गाव पुंडलिक काळे व पोलीसांचे स्वागतासाठी सज्ज होता. पुंडलिक काळे यांना घेऊन पोलीस व ट्रस्ट चे स्वयंसेवक पुंडलिक काळे यांच्या राहत्या घरी पोहचले, तब्बल 32 वर्षा नंतर पती ला समोर पाहून त्यांच्या पत्नीला विश्वास बसत नव्हता. त्यांनी पतीला टिळा लावून औक्षण केले, त्यावेळी तिथे हजर असलेल्या प्रत्येकाचे डोळे पानावले होते. 32 वर्षा नंतरची ही वीर-ज़ाराची भेट गावातील प्रत्येक नागरीक आपल्या डोळयात साठवून घेत होता.