सोशल मीडिया(Social Media)च्या दुनियेत सध्या दोन अमेरिकन अनिवासी (NRI) भारतीयांची जोरदार चर्चा आहे. अमेरिकेत राहणारे दोन एनआरआय भावंडं 25 रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी भारतात आले होते. इथं त्यांनी आंध्र प्रदेशातल्या एका व्यक्तीचा शोध घेतला ज्यानं या भावंडांना 11 वर्षांपूर्वी भुईमूग (Peanut) दिले होते. एवढ्या वर्षांनंतर या दोन भावा-बहिणींनं शेंगदाणा विक्रेत्याचं कर्ज अतिशय अशाप्रकारे फेडलं. आता या दोन भावंडांची सोशल मीडियावर खूप कौतुक केलं जातंय. आजही काही लोकांची सद्सद्विवेक बुद्धी जिवंत आहे, असंच सगळे म्हणताहेत. चला जाणून घेऊ या, ही सर्व कहाणी…
शेंगदाणे तर घेतले, मात्र पैसे विसरले
2010च्या सुमारास घडलेली ही घटना आहे. एनआरआय मोहन त्यांचा मुलगा नेमानी प्रणव आणि मुलगी सुचिता यांच्यासह आंध्र प्रदेशातील यू कोतापल्ली बीचला भेट देण्यासाठी आले होते. इथं मोहन यांनी सतैया नावाच्या भुईमूग विक्रेत्याकडून आपल्या मुलांसाठी शेंगदाणे विकत घेतले होते. त्यानंतर मुलं एन्जॉय करू लागली. मात्र पैसे देण्याची वेळ आली असता पर्स घरीच विसरल्याचं मोहन यांना समजलं. पण सतैया मोठ्या मनाचा निघाला. त्यानं मुलांना शेंगदाणे मोफत दिले. मोहननं तेव्हा सतैयाला वचन दिलं, की तो हे कर्ज लवकरच फेडेल. मग सतैयाचा फोटोही काढला.
अकरा वर्षानंतर घेतला शोध
लोक साधारणपणे हे विसरतात. आंध्रच्या मोहन यांच्याबाबतीतही असाच प्रकार घडला आणि कर्जाची परतफेड न करता ते कुटुंबासह अमेरिकेला निघून गेले. मात्र त्यांच्यात प्रामाणिकपणा होता. 11 वर्षांनंतर ते आपल्या मुलांसह भारतात परतले, तेव्हा त्यांनी सतैयाचा शोध लावला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचं कर्ज फेडलं.
आमदाराची घेतली मदत
याचीही रंजक कहाणी आहे. मोहनच्या मुलांनी काकीनाडा शहराचे आमदार द्वारमपुडी चंद्रशेखर रेड्डी यांची या कामी मदत घेतली. आमदार रेड्डी यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर सत्तैयाचा जुना फोटो टाकून एक पोस्ट शेअर केली. त्याचा तत्काळ परिणाम होऊन सत्तैयाची संपूर्ण माहिती मिळाली. पण दुर्दैव, हा आनंदाचा क्षण अनुभवायला सत्तैया या जगात नव्हते. मात्र मोहन यांच्या मुलांनी त्यांचं वचन पूर्ण केलं आणि सत्तैयाच्या कुटुंबाला 25 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला.