टोमॅटोची महागाई पाहून ऑटो रिक्षा चालकाची भन्नाट योजना, सोशल मिडीयावर झाली तूफान व्हायरल
लोकांना वाटते ही योजना फेक आहे. परंतू मी रिक्षावर पोस्टर लावले आहे,त्यात टोमॅटो फ्री योजनेची माहीती दिली आहे. आपला मोबाईल क्रमांक त्यावर दिला असल्याचे ऑटो रिक्षा चालक अनिल कुमार यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली | 21 जुलै 2023 : टोमॅटोच्या वाढत्या किंमतीने ( Tomato Price ) ग्राहकांचा खिसा कापला गेला आहे. आता टोमॅटोची किंमती चढ्याच असल्याने आता तर लोक महागड्या वस्तूंवर टोमॅटो मोफत देण्याच्या आकर्षक योजना सुरु करीत आहेत. एकाने मोबाईल खरेदीवर टोमॅटो फ्री देण्याची योजना राबविल्यानंतर आता एका रिक्षा चालकाने प्रवाशांसाठी भन्नाट ऑफर आणली आहे. पाहुयात काय नेमकी ऑफर आहे ते…
टोमॅटोच्या किंमतीने उत्तर भारतात उच्चांक गाठला आहे. एकतर अतिवृष्टीने जागोजागी नद्यांना पुर आला आहे. त्यात दुसरीकडे पाल्याभाज्या आणि फळभाज्यांच्या किंमतीने आभाळ गाठले आहे. ऑटो रिक्षाचालक अनिल कुमार नवीन ऑफर आणली आहे. त्यानूसार त्यांच्या रिक्षात बसणाऱ्या प्रवाशांना आता टोमॅटोची आगळी वेगळी ऑफर आणली आहे.
अनिल कुमार यांच्या रिक्षात पाचवेळा बसणाऱ्या प्रवाशांना आता एक किलो टोमॅटो फ्रि देण्यात येणार आहेत. लोकांना वाटते ही योजना फेक आहे. परंतू मी रिक्षावर पोस्टर लावले आहे,त्यात टोमॅटो फ्री योजनेची माहीती दिली आहे. आपला मोबाईल क्रमांक त्यावर दिला असल्याचे चंदीगडचे ऑटो रिक्षा चालक अनिल कुमार यांनी म्हटले आहे.
व्यवसाय वाढण्यास मदत
या योजनेने माझा व्यवसाय वाढण्यास मदत मिळणार आहे. तसेच प्रवाशांना टोमॅटो फ्री मिळणार आहे. जे लोक माझ्या ऑटो रिक्षावरील या योजनेचे पोस्टर वाचतात. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो.त्यामुळे देखील मला समाधान मिळते. जीवनात प्रत्येक क्षण साजरा करता आला पाहीजे. जीवन रडतखडत जगण्यापेक्षा हसतखेळत जगावे अशी माझी धारणा असल्याचे अनिल कुमार सांगतात.
12 वर्षे सैनिकांची सेवा
आपण गेली 12 वर्षे गर्भवती महिला आणि आर्मीच्या जवानांकडून प्रवासाचे पैसे घेत नाही. देशाचे जवान मायनस 40 डीग्री थंडीत सीमेवर पहारा करीत असतात त्यांच्यासाठी हा माझा छोटा प्रयत्न असल्याचे ते म्हणतात. जेव्हा क्रिकेट मॅचमध्ये भारत पाकिस्तानला हरवतो तेव्हा पाच दिवस मी रिक्षा मोफत चालवितो. नीरज चोप्राला ओलंपिक गोल्ड मेडल मिळाले तेव्हाही पाच दिवस मोफत प्रवास घडविला होता अशी आठवण अनिल कुमार यांनी सांगितली.