प्रेम ही खूप धाडसी गोष्ट आहे. प्रेमात माणूस काहीही करू शकतो. मुळातच प्रेम ही काय विचार करून करण्यासारखी गोष्ट नाही. वय, जात, धर्म, रंग अशा कुठल्याच गोष्टी एकदा आपण प्रेमात पडलो की त्या आपल्यासाठी महत्त्वाच्या नसतात. आपण त्यात वाहवत जातो. मग आता अशीच लव्ह स्टोरी सीमेपलीकडे, पाकिस्तानात का नसू शकते?
एका पन्नास वर्षांच्या महिलेने आपल्याच वीस वर्षांच्या नोकराच्या प्रेमात पडून नंतर त्याच्याशी लग्न केलं. होय. लोकांचा प्रचंड रोष पत्करून या दोघांनी सगळ्यांना विरोध करत एकमेकांशी लग्न केलं.
खरं तर हे प्रकरण पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात असलेल्या सरगोधा शहरातलं आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, तिथल्या एका युट्यूबरने सैयद बासित अली याने ही लव्ह स्टोरी जगापुढे आणलीये.
शाजिया नावाची ही महिला पन्नास वर्षांची आहे. तरुणाचं नाव फारुख आहे जो वीस वर्षांचा आहे. जेव्हा फारुख शाझियाच्या घरी नोकर म्हणून आला होता तेव्हा हे सर्व सुरू झालं. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.
शाजिया पाकिस्तानात तिच्या घरात एकटीच राहते. याच कारणामुळे त्यांनी फारुख यांना घरात नोकर म्हणून ठेवले.
फारुख माझी खूप काळजी घेत असे आणि हीच गोष्ट मला आवडली आणि मी त्याच्या प्रेमात पडले, असे त्याने सांगितले.
त्यानंतर काही दिवसांतच शाजियाने स्वत: फारुखला प्रपोज केलं. फारुखच्या मागे कुणीही नव्हतं, म्हणून तो हो म्हणाला.
फारुख सांगतात की, शाजियाच्या घरात त्यांना घरचा सदस्य मानलं जायचं. पहिल्याच दिवशी भेंडीची भाजी बनवून खाऊ घातल्यावर त्याचं भरभरून कौतुक झालं.
फारुख यांनी सांगितले की, शाजियाने प्रपोज केलं असलं तरी त्यांनाही शाजिया तितकीच हवी होती. सध्या दोघांनी लग्नही केलं असून दोघांच्या प्रेमाची चर्चा कॉमन झालीये.