पिकतं तिथं विकलं जात नाही हेच खरं, साध्यासुधी भारतीय खाट अमेरिकन वेबसाईटवर ठरली लखपती
आता लाकडी खाट भारतातील ग्रामीण भागात पहायला मिळते. या खाटांचे कारागीर कमी झाले असले तरी पाठदुखीसाठी ही खाट उत्तम असल्याचं आता अमेरिकन लोकांना पटलंय वाटतं
मुंबई : पूर्वी मुंबईतील चाळसंस्कृती प्रत्येकाच्या दारांमध्ये लाकडाची खाट दिसायची. घराच्या अंगणात ही खाट तयार करताना कामगार दिसायचे. या खाटेवर अंग टाकले की रात्री आभाळातील चांदण्या पहात झोप कधी यायची ते कळायचं देखील नाही. हल्ली अशा काथ्यापासून किंवा प्लास्टीक दोरीपासून विणलेल्या खाटा मुंबईत कमी पहायला मिळत असल्या तरी ग्रामीण भागात प्रत्येकाच्या दारात अशा लाकडी खाटा हटकून पहायला मिळतात. परंतू ऑनलाईन वस्तू विक्री करणाऱ्या अमेरिकन ई-कॉमर्स वेबसाईटवर अशा साध्या सुध्या लाकडी खाटेची विक्री किंमत तुम्ही पाहाल तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल..
गिरणीकामगारांचा जेव्हा मुंबईत चांगला राबता होता. तेव्हा विविध पाळ्यांमध्ये काम करणारे कामगार घराच्या बाहेर काथ्यांनी किंवा प्लास्टीकच्या दोऱ्यांनी विणलेल्या लाकडी खाटांवर आराम करताना किंवा झोपताना दिसायचे. उत्तर प्रदेश किंवा इतर राज्यातून मुंबईत आलेले मजूर देखील अशा खाटांचा सर्रास वापर करताना दिसायाचे. या खाटांना तयार करण्यासाठी बाबूंचा वापर केला जात असताचा. बांबूना खाचे पाडून नंतर त्यांना तासून टोक काढून हे बांबू चांगले खाच्यात ठोकून चारपायी किंवा तयार केली जायची. नंतर काथ्यांचा वा प्लास्टीक दोरी किंवा पट्ट्यांचा वापर करून खाटांना विणले जायचे. हा सोहळा पाहणे देखील मजेशीर असायचे. ही खाट उभी करून दारात टांगलेली असायची. आणि कोणी पाहूणे आले की लगेच खाट टाकून त्यांना बसण्यासाठी जागा केली जायची.
अशा सर्वात लोकप्रिय असलेल्या या खाटांना आजच्या पलंग आणि सोफ्याच्या काळात शहरात फारशी मागणी दिसत नसली किंवा त्यांना बाळगणे ओल्ड फॅशन असं वाटत असलं तरी एका अमेरिकन ई-कॉमर्स वेबसाईटवर आता हीच खाट विक्रीसाठी मांडली आहे. आणि या साध्यासुध्या वाटणाऱ्या खाटेची किंमत तब्बल 1 लाख 12 हजार 158 रूपये दाखविण्यात आली आहे. या वेबसाईटवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की आता आम्हाला कोणी गरीब म्हणणार नाही कारण आजही आमच्या घरी सहा खाट आहेत ! तर एका युजरने 1400 डॉलर काही मोठी रक्कम नाही, भारतीय रुपयांत ही मोठी रक्कम आहे असे म्हटले आहे.