सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने शारजातील भारतीय भारावला, कर्मचाऱ्यांच्या पत्नीलाही पगार देणार
संबंधित कर्मचाऱ्याने कंपनीसोबत किती वर्ष काम केलं आहे, त्यानुसार त्याच्या सहचारिणीचे मानधन ठरवलं जाणार आहे. (UAE Dr Sohan Roy employees wives)
दुबई : लॉकडाऊनचा फटका बसल्यानंतर पगार कपातीपासून कर्मचारी कपातीपर्यंत अनेक कठोर निर्णय घेण्याची वेळ बड्या कंपन्यांवर आली. मात्र यूएईमधील भारतीय वंशाच्या उद्योजकाचा दानशूरपणा पाहायला मिळत आहे. डॉ. सोहन रॉय यांनी फक्त आपल्या कर्मचाऱ्यांचेच पगार दिले नाहीत, तर त्यांच्या गृहिणींनाही मानधन दिलं. सुप्रीम कोर्टाने गृहिणींसंदर्भात दिलेल्या निर्णयाने डॉ. राय प्रेरित झाले. (Indian origin UAE businessman Dr Sohan Roy to pay salaries to his employees wives)
कोरोना साथीच्या काळात घरची आघाडी समर्थपणे पाळल्याबद्दल फूल ना फुलाची पाकळी म्हणून डॉ. सोहन रॉय यांनी कर्मचाऱ्यांच्या गृहिणी पत्नींनाही पगार देण्याचा निर्णय घेतला. सोहन रॉय यांची कंपनी सध्या पुरुष कर्मचाऱ्यांच्या पत्नीचा डेटा जमवत असल्याची माहिती यूएईतील ‘खलीज टाईम्स’ने दिली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने कंपनीसोबत किती वर्ष काम केलं आहे, त्यानुसार त्याच्या सहचारिणीचे मानधन ठरवलं जाणार आहे.
कोण आहेत डॉ. सोहन रॉय?
भारतीय वंशाचे डॉ. रॉय हे शारजा स्थित एरीस ग्रुप ऑप कंपनीजचे प्रमोटर आहेत. डॉ. सोहन रॉय हे मूळ केरळाचे आहेत. मध्य पूर्व देशातील प्रभावशाली नेते म्हणून 2017 मध्ये ‘फोर्ब्ज मिडल ईस्ट’च्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला होता.
एरीस ग्रुप ऑफ कंपनीजच्या संस्थापकांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अनेक कंपन्यांनी कोव्हिड लॉकडाऊनच्या काळात आर्थिक फटका बसल्याने कर्मचारी कपात केली होती. परंतु एरीस कंपनीने तशी पावलं न उचलत आपलं वेगळेपण दाखवलं होतं. आता कंपनीला अप्रत्यक्ष हातभार लावणाऱ्या गृहिणींचीही ते दखल घेणार आहेत.
सुप्रीम कोर्टाने गृहिणींसंदर्भात दिलेल्या निर्णयावरुन डॉ. सोहन रॉय प्रेरित झाले. गृहिणीच्या कामाचे मोल ऑफिसमध्ये काम करणाऱ्या पतीपेक्षा तसूभरही कमी नाही, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं होतं. (Indian origin UAE businessman Dr Sohan Roy to pay salaries to his employees wives)
काय होता निकाल?
कार्यालयीन काम करणाऱ्या पतीच्या तुलनेत गृहिणीने घरात केलेल्या कामाचं मूल्य तसूभरही कमी नाही, असा निर्वाळा देत सुप्रीम कोर्टाने अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईत जानेवारी महिन्यात वाढ केली होती. दिल्लीत एप्रिल 2014 मध्ये कारच्या धडकेत दुचाकीस्वार जोडप्याचा मृत्यू झाला होता. जस्टीस एन वी रामणा आणि सूर्य कांत यांच्या खंडपीठाने दाम्पत्याच्या नातेवाईकांना मिळणारी नुकसान भरपाई 11.20 लाखांवरुन थेट 33.20 लाखांवर नेली. मे 2014 पासून वार्षिक 9 टक्के व्याजदराने संबंधित इन्शुरन्स कंपनीला मयत व्यक्तीच्या वडिलांना ही रक्कम द्यायची आहे.
जुन्या प्रकरणाचा हवाला
2001 मधील लता वाधवा केसचा हवाला देत जस्टीस एन वी रामणा यांनी हा निकाल दिला. गृहिणीने घरात दिलेल्या सेवेचं मूल्यमापन करुन अग्नितांडवातील पीडितांना नुकसान भरपाई मिळावी, असा निकाल त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.
संबंधित बातम्या :
गृहिणीच्या घरातील कामाचं मूल्य पतीच्या कार्यालयीन कामापेक्षा तसूभरही कमी नाही : सुप्रीम कोर्ट
कुटुंबात गृहिणीचं काम आव्हानात्मक, पण कौतुक नाही, कोर्टाने घेतली ‘तिची’ दखल
(Indian origin UAE businessman Dr Sohan Roy to pay salaries to his employees wives)