Goldman | दोन किलो सोन्याचे दागिने घालून कुल्फी विकणारा ‘गोल्डमॅन’ चर्चेत…
चटपटीत खाण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी मध्यप्रदेशमधील इंदौर शहर ओळखलं जातं. पण सध्या हे शहर तेथील गोल्डमॅनमुळे चर्चेत आहे. हा गोल्डमॅन दुसरा तिसरा कोणी नसून येथील सराफा बाजारातील कुल्फी विक्रेता बंटी यादव आहे.
इंदोर | 26 डिसेंबर 2023 : चटपटीत खाण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी मध्यप्रदेशमधील इंदौर शहर ओळखलं जातं. पण सध्या हे शहर तेथील गोल्डमॅनमुळे चर्चेत आहे. हा गोल्डमॅन दुसरा तिसरा कोणी नसून येथील सराफा बाजारातील कुल्फी विक्रेता बंटी यादव आहे. थोडथोडकं नव्हे किलोकिलोचे सोन्याचे दागिने घालून तो त्याच्या दुकानाता कुल्फी विकायला उभा असतो. त्याला पाहण्यासाठी आणि त्याच्या कुल्फीचा स्वाद घेण्यासाठी लोकं लांबून येत असतात. त्यांच्यासोबत बऱ्याच जणांना सेल्फी आणि फोटोही काढायचे असतात.
इंदूरमधील सराफा चौपाटी येथे बंटी यादवने आपले दुकान थाटले आहे. सराफा बाजारात सोन्या-चांदीचा चांगलाच धंदा सुरू असतो. याच बाजारात बसून बंटी यालाही सोन्याची आवड निर्माण झाली आणि दरवर्षी एकेक दागिना विकत घेऊन त्याने अंगावर घालायला सुरुवात केली. सध्या त्याच्याकडे दोन किलो सोन्याचे दागिने आहेत. हे सर्व दागिने घालूनच ते त्यांच्या दुकानात कुल्फी विकत असतात.
अशी झाली दागिने घालायची सुरूवात
बंटी यादवच्या सांगण्यानुसार, त्याने अंगठीपासूनच सोन्याचे दागिने घालण्यास सुरुवात केली. आधी सगळ्या बोटात अंगठ्या घातल्या, मग सोन्याचे चेन, कडं वगैरे बनवून घेतलं आणि ते घालायला सुरुवात केली. सध्या त्याच्या गळ्यात एक-दोन नव्हे तर अर्धा डझनहून अधिक सोन्याची चेन आणि हातात कडं आणि ब्रेसलेट आहे.
त्यांचा दातही सोन्याचा ?
एवढंच नव्हे तर बंटी यादव यांचा एक दातही सोन्याचा आहे. एकदा माझा दात तुटला होता, त्यामुळे मी तेव्हा सोन्याचा दात बनवून घेतला आणि तोच लावला. माझ्या कुल्फीची चव तर लोकांना आवडतेच पण माझ्यासोबत फोटो काढण्यासाठीही लोक दुरून येत असतात. त्यामुळे माझा (कुल्फीचा) धंदाही जोरदार चालतो, असे बंटी यादव म्हणाले.
बंटी यादव यांच्या सांगण्यानुसार, ते लहानपणी एका ज्वेलर्सच्या दुकानात काम करायचे, तिथूनच ते सोन्याच्या प्रेमात पडले. पुढे त्यांनी येथे कुल्फी विकण्यास सुरुवात केली. इतके सोने घातल्यानंतरही त्याला काहीच त्रास होत नसल्याचे बंटी सांगतो. रात्री बारा वाजेपर्यंत बाजारात गर्दी असते. जेव्हा ते घरी जातात तेव्हा त्यांचे कर्मचारीही त्यांच्यासोबत हजर असतात. याशिवाय बाजारपेठेत दुकानाजवळ पोलीस ठाणे व पोलीस चौकीही आहे, त्यामुळे एवढं सोनं अंगावर बाळगण्याचं टेन्शन येत नसल्याचं त्यांनी नमूद केलं.