पोलीसी डॉग स्क्वॉडची नोकरी धोक्यात, या देशात आता खारूताई ड्रग्ज तस्करीचा भंडाफोड करणार
श्वानांची वास घेण्याची क्षमता मानवापेक्षा कितीतरी अधिक पट असते, तशीच क्षमता खारूताईंकडेही असते असे संशोधनात उघडकीस आले आहे. त्यामुळे आता खारूताई पोलीस दलात सामील होणार आहेत.
दिल्ली : कोणत्याही गुन्ह्याचा शोध लागत नसला तर पोलिसांच्या मदतीला खास ट्रेनिंग असणारे श्वान असतात आणि त्यांच्या मदतीने आरोपींचा माग काढतात. केवळ वासाच्या आधारे हे पोलीस श्वान ( POLICE DOG ) कोणताही अवघड गुन्हा उकल करण्यात पोलीसांना मदत करीत असतात. आता या पोलीसांना टफ कॉम्पिटीशन निर्माण झाली आहे. कारण आता त्यांच्या जागा एक चिमुकला प्राणी घेणार आहे. पोलीस दलामध्ये अनेक वर्षांपासून श्वान पथकांचा ताफा पोलीसांच्या मदतीला असतो. त्यांना आता खारूताई ( squirrel ) देखील मदत करणार आहेत.
आता पोलीसांच्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकात श्वानाची जागा आता खारूताई घेणार आहेत. सुरक्षा दलांच्या शोधक कुत्र्यांना स्निफर डॉग म्हणतात. परंतू आता स्निफर डॉगना मदत करण्यासाठी ‘स्निफर खारूताई’ तैनात होणार आहेत. त्यामुळे बिचाऱ्या स्निफर डॉगची सद्दी धोक्यात आली आहे. कारण चीन आता या कुत्र्याच्या जागी पोलीसी खारूताई तैनात करीत आहे. ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार चीन चे शहर चॉन्गकिंग मध्ये ड्रग्ज तस्करीच्या समस्येवर लढण्यासाठी पोलीस विशिष्ट जातीच्या खारूताईंचे पथक तयार करीत आहे. चॉन्गकिंगच्या हेचुआन जिल्ह्यात क्रिमिनल पोलीस डिटॅचमेंटच्या पोलीसी डॉग ब्रिगेडने ड्रग स्निफर स्क्वेरलची नवीन बॅच तयार करीत आहे. त्यांनी स्किरलच्या या टीमला खास ट्रेनिंग दिले आहे. संशोधकांना खारूताईंच्या वास घेण्याच्या क्षमतेची कल्पना होती.
खारूताईंच्या खास ब्रिगेटची निर्मिती
चीनी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानूसार हेचुआन जिल्ह्याच्या पोलीसांच्या डॉग ट्रेनिंग ब्रिगेडने यशस्वीपणे ड्रग्सचा शोध घेणाऱ्या सहा खारूताईंना प्रशिक्षण दिले आहे. त्या लवकरच पोलीसांसोबत काम करणार आहेत. या पथकाच्या प्रमुख ट्रेनर यिन जिन यांनी सांगितले की एकूण सहा खारूताईंचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांच्या प्रशिक्षणासाठी खास पद्धतीचा वापर करण्यात आला होता.
कुत्र्यांपेक्षा अधिक फायदेशीर
आता तुम्ही विचार कराल की आकाराने इतक्या आकाराच्या खारूताई अंमलीपदार्थांचा शोध कसा घेतील ? वास्तविक, खारूताईंना अशा प्रकारे ट्रेनिंग दिले आहे की, एखाद्या ठिकाणी अंमलीपदार्थांचा वास आल्यानंतर त्या लागलीच त्या ठिकाणी खोदण्यास सुरुवात करतील आणि ड्रग्जचा भंडाफोड करतील. चाचणी दरम्यान, हे सिद्ध झाले की खारूताई कुत्र्यांप्रमाणेच ड्रग्ज शोधण्यात प्रभावी आहेत आणि त्यांचा फायदा जास्त आहे, कारण त्या आकाराने लहान असल्या तरी वेगवान आहेत. त्या कितीही उंच ठिकाणी सहज पोहोचू शकतात जिथे कुत्रे पोहोचू शकत नाहीत.