Live in relationship : प्रेमाला वयाचे बंधन नसते, असे म्हणतात. प्रेम करताना केवळ मन, भावना पाहाव्या. असाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात पाहायला मिळाला. 67 वर्षीय रामकली आणि 28 वर्षीय भोलू प्रेमात पडले आहेत. आता दोघांनी एकत्र राहण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. रामकली आणि भोलू लिव्ह-इनमध्ये राहत असून आता त्यांना त्यांचे भावी आयुष्यही याच पद्धतीने घालवायचे आहे. यासाठी त्यांनी ग्वाल्हेर (Gwalior) न्यायालयात (Court) नोटरी बनवली आहे. रामकली आणि भोलू सांगतात, की दोघेही एकमेकांवर प्रेम (Love) करतात. ते गेल्या 6 वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत असून यापुढेही त्यांना एकत्र राहायचे आहे. दोघेही प्रौढ आहेत. लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत असताना भविष्यात कोणताही वाद होऊ नये आणि त्यांचे नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट व्हावे, यासाठी त्यांनी त्यांचे नाते नोटरी करून घेतले.
वकील दिलीप अवस्थी यांनी सांगितले, की हे जोडपे मध्य प्रदेशातल्या मुरैना जिल्ह्यातील कैलारसचे रहिवासी आहेत. 67 वर्षीय रामकली आणि 28 वर्षीय भोलू प्रेमात आहेत आणि त्यांना एकमेकांसोबत राहायचे आहे, पण लग्न करायचे नाही. लिव्ह-इन रिलेशनमध्ये असताना वाद होऊ नयेत, म्हणून दोघांनी नोटरी करून घेतली आहे. नोटरीसाठी त्यांनी ग्वाल्हेरच्या जिल्हा न्यायालयात लिव्ह-इन रिलेशन असल्याची कागदपत्रे सादर केली आहेत.
अॅडव्होकेट असोसिएशनचे सचिव अॅड. दिलीप अवस्थी यांच्या मते, वाद टाळण्यासाठी हे जोडपे लिव्ह-इन रिलेशनशिपची नोटरी तयार करतात. तथापि, अशा दस्तावेजासाठी कोणतेही कायदेशीर औचित्य नाही. अशाप्रकारचा कायदा फक्त इस्लाममध्ये वैध आहे. हिंदू विवाह कराराच्या श्रेणीत तो येत नाही. असे असले तरी 67 वर्षीय रामकलीच्या 28 वर्षीय भोलूवरील प्रेमाची कहाणी प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.