राँग नंबर आला… प्रेमात पडले… मुंबईतून बिहारला गेला, पुढे काय झाले?; कहानी पुरी फिल्मी नही…
कुणाच्या लग्नाची बेडी कुठे बांधलेली असेल याचा काही नेम नाही. लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात हेच खरं आहे. त्याचा अनुभव बिहारमधील एका तरुणाला आला आहे. एवढंच काय हा गडी लग्न करूनही मोकळा झाला आहे.
बांका : लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात असं सांगितलं जातं. कधी? कुठे? तुम्हाला तुमचा जोडीदार मिळेल याचा नेम नाही. एका तरुणाच्या बाबतीत असाच एक किस्सा घडला आहे. मुंबईत राहणाऱ्या एका तरुणाला मिस्ड कॉल आला. म्हणजे राँग नंबर आला. त्याने तो नंबर फिरवला. समोर एक तरुणी होती. बिहारच्या बांका येथे राहणारी ही मुलगी होती. बोलता बोलता तिच्याशी त्याची मैत्री झाली अन् दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले अन् दोघांनी चक्क लग्नही केलं. लग्न करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं होतं. त्याची कहाणीही वेगळीच आहे. पण ही कहाणी फिल्मी नाही.
बिहारच्या बांका जिल्ह्यातील पंजावार येथील ही अजब प्रेम कहाणी आहे. पंजवारा बाजारात संकटमोचन चौकात एक शिवमंदिर आहे. रविवारी संध्याकाळी या प्रेमी युगुलांचं गावकऱ्यांनी लग्न लावून दिलं. एका तरुण आणि तरुणीने पळून जावून लग्न केल्याची खबर पोलिसांना मिळाली. पण प्रत्यक्षात दोघांनी एकमेकांच्या सहमतीने विवाह केल्याचं लक्षात आलं. तसेच मुलगी सज्ञान होती. त्यामुळे पोलिसांनीही त्यांच्यात काही हस्तक्षेप केला नाही.
काय आहे प्रकरण?
ऋषभ पासवान हा पंजवारा येथील रहिवासी आहे. तो मुंबईत राहतो. त्याची बांकाा प्रखंड येथील लहरदग्गी येथील करिश्मा कुमारीशी ओळख झाली. एका मिस्ड कॉलमुळे ही ओळख झाली. हळूहळू दोघांची बातचीत वाढली. त्यांच्यात प्रेम झालं. एवढंच कशाला दोघांनी जगण्यामरण्याची शपथ घेतली. अन् लग्नही केलं. ऋषभ हा आईवडील आणि बहीण भावासोबत मुंबईत एका फॅक्ट्रीत काम करतो.
काय आहे चर्चा?
शनिवारी रात्री उशिरा ऋषभ हा करिश्माला घेऊन पंजवारा येथील आपल्या निवासस्थानी आला. त्याची माहिती मिळताच रविवारी सकाळी त्याच्या घरासमोर ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली. गावकऱ्यांनी नको त्या चर्चा करण्यास सुरुवात केली. गावकरी ऋषभच्या घराबाहेर जमल्याचं कळल्याने काही तरी अनुचित प्रकार होऊ शकतो याची भीती वाटल्याने पंचायतीचे सदस्यही घटनास्थळी पोहोचले. पंचायत सदस्यांनी या दोघांचे म्हणणे ऐकून घेतले. गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर रविवारीच संध्याकाळी पंजवारा संकटमोचन चौकातील शिव मंदिरात दोघांचे लग्न लावून दिले. त्यामुळे मोठा वाद आणि अनर्थ टळला. पण या लग्नाची संपूर्ण गावभर चर्चा सुरू आहे.