सात पिढ्या झटक्यात श्रीमंत, शेतात खोदकामादरम्यान सापडले असे काही की… दारिद्रय संपले
Panna Mining Diamonds : या शेतकऱ्याच्या सात पिढ्यांचे दारिद्रय एका झटक्यात संपले. शेतात खोदकामा दरम्यान त्याला घबाड हाती लागले. ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. त्याच्या शेतात त्याने काही वर्षांपूर्वीच खाण सुरू केली होती.

मध्य प्रदेशातील पन्ना येथील एका शेतकऱ्याचे नशीब अचानक फळफळले. इतक्या दिवसांच्या त्याच्या कष्टाला आणि त्याच्या स्वप्नांना बळ मिळाले. त्याच्या शेतात खाण सुरू होती. त्यात एक बेशकिंमती हिरा सापडला. हा हिरा 4.24 कॅरेट वजनाचा आहे. त्याची बाजारातील किंमत 20 लाखांहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. तर पॉलिशनंतर ही किंमत कित्येक पटीत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा हिरा, पन्ना येथील सरकारच्या हिरा कार्यालयात त्याने जमा केला आहे. लवकरच या हिऱ्याचा लिलाव करण्यात येणार आहे.
पन्नामध्ये हिऱ्यांची खाण
पन्ना जिल्ह्याला देशातील हिऱ्याची खाण म्हणतात. या ठिकाणच्या मातीतच जादू आहे. येथील माणूस कधी रंकचा राव होईल हे सांगता येत नाही. गहरा या गावातील शेतकरी ठाकूर प्रसाद यादव यांच्यासोबत असेच काहीसे घडले आहे. त्यांनी काही वर्षांपूर्वी शेतात खाण सुरू केली होती. त्यातून सुरुवातीला केवळ मातीच निघत होती. पण त्यांच्या कष्टाला अखेर फळ मिळाले. त्यांना 4 कॅरेट 24 सेंटचा दुर्मिळ हिरा गवसला. त्यांनी हिरा मिळताच आनंद साजरा केला. तो, हिरा कार्यालयात जमा करण्यात आला.




देवाचे मानले आभार
शेतकरी ठाकूर प्रसाद यादव यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी शेतात खाण सुरू केली होती. त्यांच्या कष्टाला पारवार उरला नव्हता. इतके खोदूनही हाती काहीच लागत नसल्याने ते थोडे निराश झाले होते. पण आता हिरा गवसल्याने त्यांनी देवाचे आभार मानले. या हिऱ्यामुळे घराचे दारिद्रय घालवल्याचे ते म्हणाले. या पैशातून नवीन काम सुरू करण्याचे आणि शेतात नवीन पीक घेण्याचा निश्चिय त्यांनी घेतला.
5 कोटी हिऱ्यांचा लिलाव
पन्ना जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे नशीब येथील मातीने बदलले आहे. पन्ना येथील हिऱ्याचे व्यापारी रविंद्र जडिया यांनी सांगितले की ही जमीन अनेकांना रात्रीतूनच श्रीमंत करते, असे आपण अनेकदा पाहिले आहे. गेल्या वर्षी 5 कोटींच्या हिऱ्यांचा लिलाव करण्यात आला होता. त्यातून अनेकांचे नशीब फळफळले. मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे मोती असे येथील लोक मोठ्या अभिमानाने सांगतात.