Video : अमृता खानविलकरच्या ‘चंद्रामुखी’ची अप्सरेला भुरळ, ‘चंद्रा’ गाण्यावर सोनाली कुलकर्णी थिरकली
अमृता खानविलकर हिच्या 'चंद्रा' या गाण्यावर सोनाली कुलकर्णी हिने डान्स केला. तिचा हा डान्स सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
मुंबई : प्रसाद ओक (Prasad Oak) दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ (Chandramukhi Movie) चित्रपट येत्या 29 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. ‘चंद्रमुखी’ची घोषणा झाल्यापासून ‘ही’ चंद्रमुखी ऊर्फ चंद्रा नक्की कोण असणार, याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. काही दिवसांपूर्वी एका आगळ्यावेगळ्या बहारदार रूपात चंद्राच्या रूपात अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) प्रेक्षकांसमोर आली. यावेळी आपल्या मोहमयी नजाकतीने या लावण्यवतीने सर्वांचीच मने जिंकली आणि याला साथ लाभली ती अजय -अतुल यांच्या दमदार संगीताची. सध्या सोशल मीडियावर ‘चंद्रा’ या गाण्याच्या नृत्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. अमृता खानविलकर हिने ज्याप्रमाणे ‘चंद्रा’ प्रेक्षकांसमोर सादर केली. त्याला तोड नाही. तिची ही अदा पाहून सामान्य प्रेक्षक तर सोडाच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनाही ‘चंद्रा’वर ठेका धरण्याचा मोह आवरला नाही. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) हिने देखील नुकताच सोशल मिडियावर ‘चंद्रा’चा नृत्य व्हिडिओ शेअर केला असून ‘लावणीच्या प्रेमाखातर’ असे कॅप्शन देत ‘प्लॅनेट मराठी’ आणि ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
सोनाली कुलकर्णी म्हणते, ” लावणीच्या प्रेमाखातर आणि त्याचबरोबर ‘हिरकणी’ टीम विशेषतः प्रसाद ओक, मंजिरी ओक, संजय मेमाणे यांच्या प्रेमाखातर हा ‘चंद्रा’वर नाचण्याचा मी प्रयत्न केला आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि चंद्रमुखीच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप शुभेच्छा.”
या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, येलस्टार फिल्म्स, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे, तर चिन्मय मांडलेकर यांचे पटकथा-संवाद आहेत. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे. विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.
संबंधित बातम्या