मुंढे मंत्रिमंडळाचा 5 जूनला विस्तार…
संतोष मुंढे आणि वैशाली घुगे या दोघांच्या लग्नाची ही हटके पत्रिका सध्या चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील मुंडे घराण्याशी मिळतं-जुळतं नाव असल्याने आणि मुख्यमंत्री मंत्रिमंडळ असा उल्लेख असल्याने ही पत्रिका चर्चेचा विषय ठरली आहे.

मुंबई : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा फोटो पाहून ही बातमी मुंडे कुटुंबाशी संबंधित असेल, असं समजून जर तुम्ही ही बातमी वाचण्यासाठी आला असाल तर आम्ही आधीच तुम्हाला सावधानतेचा इशारा देतोय, तुमचा भ्रमनिरास होऊ शकतो. कारण ही बातमी तुमच्या कल्पनेच्या थोडी पलिकडची आहे. ही बातमी आहे, एका लग्नपत्रिकेची. जी लग्नपत्रिका (Wedding Card) सध्या सर्वत्र चर्चेत आहे. कारणही तसंच आहे, कारण मुंढे मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय… आम्हाला याची जाणिव आहे की ही तारिख उलटून केली आहे पण हे प्रकरण जरा वेगळं आहे. नेमकं काय आहे? जाणून घेऊयात…
मुंढे मंत्रिमंडळाचा विस्तार
आपली लग्नपत्रिका काहीतरी विशेष असावी, असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यासाठी काही हटके करण्याचा प्रयत्न केला जातो. अशीच एक हटके अन् वेगळी लग्नपत्रिका सध्या चर्चेत आहे. यात मुंढे मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे.
व्हायरल होणारी ही लग्नपत्रिका जरा हटके आहे. यात मुख्यमंत्री संतोष मुंढे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. गृहमंत्रिपदी एका खास व्यक्तीची निवड करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे. गृहमंत्रिपद वैशाली घुगे यांच्याकडे देण्यात आलं आहे.



नातेवाईकांची निवड केल्याचा आरोप
या पत्रिकेत निष्ठावंतांना डावलून नातेवाईकांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावर मुख्यमंत्री संतोष मुंढे यांनी स्पष्टीकरण दिलं. यात कुठलंही सत्य नसून योग्य व्यक्तीची निवड करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
कुठलं खातं कुणाकडे?
आधी उल्लेख केल्याप्रमाणे गृहमंत्रिपदी वैशाली घुगे यांची निवड करण्यात आहे. त्याची परवानगी बबनराव मुंढे यांनी दिली असल्याचा उल्लेख यात करण्यात आला आहे. तर सामान्य प्रशासन आणि अर्थखातं मुख्यमंत्री स्वत: कडे ठेवणार आहेत.
आप्तेष्टांच्या उपस्थितीत शपथविधी
या शपथविधीली काही आप्तेष्ट, जवळची मंडळीचउपस्थित राहणार आहेत. त्यांच्या शुभ आशिर्वादाने हा सोहळा पार पडणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
ही लग्नपत्रिका आहे संतोष मुंढे आणि वैशाली घुगे यांच्या लग्नाची. या दोघांच्या लग्नाची ही हटके पत्रिका सध्या चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील मुंडे घराण्याशी मिळतं-जुळतं नाव असल्याने आणि मुख्यमंत्री मंत्रिमंडळ असा उल्लेख असल्याने ही पत्रिका चर्चेचा विषय ठरली आहे. तुम्ही म्हणाल आज 5 जून ही तारिख तर उलटून गेली, आता ही बातमी का? तर बघा, हे लग्न 6 जून 2006 ला पार पडलं आहे. पण संतोष यांनी त्यांच्या फेसबुकला ही पत्रिका शेअर केली अन् त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचमुळे ही विशेष लग्न पत्रिका आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.