प्रवासी वाहतूकीद्वारे रेल्वेला केवळ 20 टक्केच होते कमाई, मग उर्वरित उत्पन्न येते कुठून ?
रेल्वेला प्रवासी भाड्यातून कोणताही फायदा होत नाही. उलट झाला तर तोटाच होत असतो, मग रेल्वेचा गाडा चालतो कसा ? पाहूया...
नवी दिल्ली : रेल्वेने दररोज दोन कोटीहून अधिक प्रवासी प्रवास करीत असतात. परंतू या प्रवासी तिकीटाच्या उत्पन्नातून रेल्वेला केवळ वीस टक्केच उत्पन्न मिळत असते. रेल्वेचे प्रवासी भाडे खूपच कमी असते. कारण या रेल्वे भाड्याला सबसिडी दिलेली आहे. रेल्वेचा प्रवास सर्वात स्वस्त आणि खात्रीलायक असतो. लोक रस्ते मार्गाने प्रवास करण्यापेक्षा आरामदायीपणा तसेच स्वस्त तिकीट असल्याने रेल्वेने लांबचा प्रवास करण्याला प्राधान्य देत असतात. मात्र रेल्वेला यातून जास्त कमाई होत नसते, मग रेल्वेचे भागते कसे हे पाहूया…
रेल्वेच्या प्रवासी तिकीटाद्वारे रेल्वेला केवळ वीस टक्केच उत्पन्न मिळत असते. त्यामुळे रेल्वेला उत्पन्न कुठून मिळते हे पहायला हवे, जर प्रवासी तिकीटांमधून रेल्वेला काहीच फायदा होत नसेल तर रेल्वे आपला खर्च कसा भागवते हे पहाणे महत्वाचे आहे.
मालभाड्यातून होते कमाई
रेल्वे प्रवाशांच्या वाहतूकी सोबत रेल्वेचे खूप मोठे जाळे मालवाहतूकीसाठी वापरले जाते. एका आकडेवारीनूसार रेल्वेने दररोज दोन कोटींहून अधिक प्रवासी रोजचा प्रवास करीत असतात. तर दररोज नऊ हजाराहून अधिक मालगाड्या चालविल्या जात असतात. त्यामुळे रेल्वेला इतर मार्गाने होणारी कमाई रेल्वे प्रवासी वाहतूकीला सबसिडी देण्यासाठी वापरत असते. त्यामुळे रेल्वेचा प्रवास इतर प्रवासी साधनांपेक्षा स्वस्त असतो.
येथून होत असते कमाई
भारतीय रेल्वेचे नेटवर्क जगातील सर्वात मोठ्या नेटवर्क पैकी मानले जाते. रेल्वेला मेन्टेनन्ससाठी खूप जास्त खर्च येतो. या खर्चाला पूर्ण करण्यासाठी रेल्वेला खूपच पैशाची गरज असते. वाणिज्य मंत्रालयाच्या सरकारी ट्रस्ट इंडीया ब्रांड इक्वीटी फाऊंडेशनच्या रिपोर्टनूसार आर्थिक वर्षे 2021-22 मध्ये रेल्वेच्या प्रवासी भाड्यातून कमाईचा वाटा 20.2 टक्के राहीला आहे. मालभाड्यातून कमाईचा वाटा 75.2 टक्के होता. तर अन्य 4.6 टक्के कमाई इतर स्रोतामधून झाली आहे. ज्यात रेल्वेचे भंगार विक्री आणि इतर योजनांचा समावेश आहे.