नाशिक: साप आणि मुंगूस…एकमेकांचे जानीदुश्मन, तसं पाहायला गेलं तर एक शिकारी आणि दुसरा शिकार. साप हा कितीही विषारी आहे, याचा मुंगसाला फरक पडत नाही. तो त्याची शिकार केल्याशिवाय सोडतच नाही. असाच एक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुंगसापासून लपून पळ काढणाऱ्या सापाचा मुंगसाने फडशा पाडला आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ नाशिकमधला आहे.ज्यात शिकारी आणि शिकार यांच्यातला थरार पाहायला मिळतो आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मुंगूस एका झाडाभोवती फिरताना तुम्हाला दिसत आहे. हे मुंगूस इथं का बरं फिरत असावं असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर याचं उत्तर आहे त्याची शिकार म्हणजे साप. हा साप तुम्हाला मुंगसाच्या अगदी वरच्या झाडावर दिसेल.
मुंगसाला आलेलं पाहून सापाने तिथून पोबारा करण्यातच धन्यता मानली, आणि सरळ शेजारच्या झाडावर चढला. मुंगूस हे सापाला खालीच शोधत राहिलं. मुंगसाच्या तावडीतून सुटलो असं सापाला वाटत असेल, पण हे तितकंसं सोपं नाही.
मुंगूस भलतच हुशार निघालं, साप आपल्याला गंडवत असल्याचं कदाचित त्याच्या लक्षात आलं असणार. त्यामुळेच काहीवेळ काही शोधल्यानंतर त्याने झाडावर पाहिलं आणि इथंच डाव पलटला.
मग काय, मुंगसाने थेट सापाच्या दिशेने उडी घेतली, आणि थेट त्याचं मुंडकं आपल्या तोंडात पकडलं आणि त्याला झाडावरुन खाली खेचलं. झाडावरुन खाली येताच सापाचे सगळे प्रयत्न संपलेले होते. कारण, मुंगसाच्या तोंडात थेट सापाचं तोंडच आलं होतं.
व्हायरल होणारा व्हिडीओ नाशिक जिल्ह्यातला आहे. वनविभाग नाशिक यांच्याकडून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांमधून चांगली पसंती मिळताना दिसत आहे.
आता तुम्ही म्हणाल, सापाच्या विषाचा मुंगसावर काही फरक का पडत नाही. तर त्याचं साधं सरळ उत्तर आहे, मुंगसाची त्वचा आणि त्याच्या अंगावरील केस. मुंगसाची कातडी ही जाड असते, ज्यातून सापाचे दात आत जात नाही, तर केसांमुळेही सापाला मुंगसाला दंश करता येत नाही. याच गोष्टीमुळे मुंगूस कुठल्याही सापाची सहज शिकार करतं.