Viral : महिला बेशुद्ध झाली अन् सिग्नल तोडून कार पुढे जाऊ लागली, सुदैवानं वाचले प्राण; पाहा, थरारक Video
उच्च रक्तदाबाच्या गोळ्या आणि टेस्ट करण्यापूर्वी काहीही खाल्लेले नसल्यामुळे तिला चक्कर आली. बेशुद्ध झाल्यानंतर ती ट्रॅफिक सिग्नल तोडून पुढे जात होती. त्यावेळी तेथील लोकांनी तिला मदत केली.

कार चालविताना महिला बेशुद्ध (Unconscious) झाल्याची धक्कादायक घटना घडली असून त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात (Accident) झाल्याच्या अनेक घटना आपण पाहत असतो. अशीच एक घटना अमेरिकेत घडली आहे. मात्र या महिलेला आजूबाजूच्या लोकांनी मदत केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. कार चालवताना एका आरोग्याच्या समस्येने त्रस्त महिलेचे प्राण वाचवल्याबद्दल सोशल मीडियावर या लोकांचे कौतुकही केले जात आहे. याचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे, की एका महिलेची कार ट्रॅफिक सिग्नल (Traffic signal) असलेल्या चौकात हळू हळू पोहोचते. यावेळी रेड सिग्नल लागलेला असतो. त्यावेळी शेजारी गाडी चालवणाऱ्या तिच्या सहकारी महिलेला काहीतरी गडबड झाल्याचे लक्षात आले आणि ती गाडीतून त्वरीत उतरते आणि इतर वाहनधारकांचे लक्ष वेधण्यासाठी हात फिरवत पुढे धावते.
स्टियरिंगवरच पडली बेशुद्ध
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संबंधित महिला स्टियरिंगवरच बेशुद्ध झाली, हे सहकारी महिलेच्या लक्षात आले. त्यामुळे ही गाडी रेड सिग्नल असतानाही चौकातून पुढे जात होती. तेव्हा इतर वाहनांतील लोक एक एक करून ही कार थांबवण्यासाठी त्यांच्या कारमधून बाहेर पडले आणि मदतीसाठी धावले. कार थांबल्यानंतर एका महिलेने आपल्या कारमधून डंबेल काढून एका पुरुषाला दिले, त्याने महिलेला वाचवण्यासाठी कारची बाजूची खिडकी तोडली. यानंतर कारचं लॉक उघडून महिलेला वैद्यकीय मदत देण्यात आली. लॉरी राब्योर असे या महिलेचे नाव असून ती वेस्ट पाम बीच येथील रहिवासी आहे.
मदत करणाऱ्या लोकांची लवकरच घेणार भेट
रेब्योर म्हणाली, की उच्च रक्तदाबाच्या गोळ्या आणि टेस्ट करण्यापूर्वी काहीही खाल्लेले नसल्यामुळे तिला चक्कर आली. बेशुद्ध झाल्यानंतर ती ट्रॅफिक सिग्नल तोडून पुढे जात होती. त्यावेळी तेथील लोकांनी तिला मदत केली. दरम्यान, पोलिसांनी तिला मदत करणाऱ्या लोकांना शोधले आहे. लवकरच ते लॉरीची या लोकांसोबत भेट घालून देणार आहेत.