Mira Road : मिरारोड रेल्वे स्थानकात अचानक रिक्षाची एन्ट्री! ड्रायव्हरने केलं असं काही की धाकधूक वाढली
मिरारोड स्थानाकात रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. कारण रिक्षाने थेट प्लॅटफॉर्मवर एन्ट्री मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी ड्रायव्हरची स्थिती पाहून उभ्या असलेल्या प्रवाशांना चांगलाच घाम फुटला होता.
मुंबई : मुंबई शहरात प्रत्येक सेकंदाचं महत्त्व आहे. या मुंबईची रेल्वे ही लाईफलाईन आहे. दिवसाला लाखो प्रवासी या रेल्वेतून प्रवास करत असतात. रेल्वेचा प्रवास परडवणारा आणि झटपट असा असल्याने मुंबईकरांकडून पहिली पसंती मिळते. प्रत्येक चार मिनिटांनी लोकल धावत असते, यावरून लोकलचं महत्त्व अधोरेखित होतं. अशात एखादी लोकल उशिरा झाली किंवा रद्द झाली की प्लॅटफॉर्मवर मुंगी घुसणार नाही इतकी गर्दी होते. मुंबईची अशी स्थिती असताना रविवारी रात्रीच्या सुमारास एक रिक्षा रेल्वे स्थानक परिसरात घुसली. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिक्षा मिरारोड पूर्वेकडून प्लॅटफॉर्मवर घुसवण्याचा प्रयत्न केला आणि एकच खळबळ उडाली.
प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, 48 वर्षीय जयराज चौहान हा चालक दारू प्यायलेला होता. त्याने प्लॅटफॉर्मवर रिक्षा घुसवण्याचा प्रयत्न केला. मात्र शक्य न झाल्याने त्याने युटर्न घेतला. रेल्वे स्थानकातून रिक्षा बाहेर काढण्यासठी त्याने पायऱ्यावरून उतरवण्यासाठी प्रयत्न केला. पण सजग प्रवाशांनी त्याला तसं करण्यापासू रोखलं आणि त्याला पकडलं. या पायऱ्यांवर प्रवाशाची गर्दी असते. तसेच काही फेरीवाले या ठिकाणी बसलेले असतात. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
@PoliceMira Drunk auto driver enters Mira Road station. Request that auto driver's license be suspended and that the auto be kept at police station for 10 days . pic.twitter.com/JTseseeT1O
— Shyaamm Menen (@ShyamMenon3) August 29, 2023
दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, “रिक्षा ड्रायव्ह मद्यधुंद अवस्थेत होता. दोन्ही बाजूला रेलिंग नसलेल्या उतारावरून त्याने रिक्षा प्लॅटफॉर्मकडे वळवली. सुदैवाने रविवार असल्याने स्टेशन आवारात गर्दी कमी होती.”
घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही जणांनी या घटनेचा व्हिडीओ चित्रित केला आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच रिक्षा चालकाला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. रेल्वे पोलिसांनी रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून वैयक्तिक बॉण्डवर सोडण्यात आलं आहे.