शिक्षकाने नोकरी गेली तर अनोखी शेती सुरू केली, LED बल्बमुळे लाखोंची होतेय कमाई
फुलांची शेती तर अनेक शेतकरी करतात, परंतू अजय याने नव्या तंत्राचा वापर केला. त्याने एलइडी बल्बचा वापर करीत शेती सुरू केली.
नवी दिल्ली : इच्छा असेल तर मार्ग आपोआप तयार होत असतो, या ओळी एका तरूणाने सत्यात आणल्या आहेत. झारखंडच्या हजारीबाग येथे राहणारे अजय कुमार यांनी अनोख्या पद्धतीने केलेल्या शेतीची सगळीकडे चर्चा सुरु आहे. कोरोनाकाळात एका खाजगी शाळेत संगीत शिक्षक असलेल्या अजय कुमार यांची नोकरी गेली तरीही हार न मानता त्यांनी आपल्या नापिक जमिनीत नंदनवन फुलविले. त्यांनी त्यासाठी कोणता उपाय केला हे पाहणे महत्वाचे आहे. त्यांनी एलईडी बल्बच्या उजेडात रात्री फुलणाऱ्या शेतीची नविन पद्धत शोधून काढली आहे. या तंत्राने अजय केवळ प्रगतीशील शेतकरीच झाले नाहीत तर अख्खा जिल्ह्यात त्यांची चर्चा सुरू आहे.
अजय कुमार यांची नोकरी कोरोनाकाळात गेली. ते एका खाजगी शाळेत संगीत शिक्षक होते. परंतू त्यांनी अजिबात हार मानली नाही. बेरोजगार झाल्यावर त्यांनी शेती सुरू केली. प्रथम त्यांनी भाजीपाला पिकविण्यापासुन सुरूवात केली. परंतू नशिबाने साथ न दिल्याने पिक वाया गेले. त्यामुळे हार न मानता त्यांनी लीजवर जमिन घेत फुलांची शेती सुरू केली आणि हा प्रयोग यशस्वी झाला.
एलईडी बल्बच्या मदतीने रात्रीची शेती
झारखंडमध्ये एलईडीचा वापर करून शेती करणारे अजय कुमार पहिले शेतकरी आहेत. अजय सांगतात त्यांना फुलांची रोपे देणाऱ्यांनी बल्बचा प्रकाश फुलांवर पडायला हवा असे सांगितले होते. त्यामुळे रोपे लवकर वाढतील. त्यांनी तसेच केले. त्यामुळे वेळे आधीच फुले यायला लागली. त्यामुळे संपूर्ण शेत फुलांनी बहरले. एलईडी बल्ब लावल्याने दुसरा असा फायदा झाला की जंगली जनावरे येणे बंद झाले तसेच तिसरा फायदा असा झाला की मुले आता शेतातच बल्बच्या उजेडात अभ्यास करू लागली.
दहा हजाराच्या गुंतवणूकीतून चांगले उत्पन्न
अजयने त्याच्या शेतात 1600 शेवंती , 3000 झेंडू, 1000 ग्लॅड्यूलअस, 200 जाई आणि 100 डेलियाची रोपे लावली. 18 डिसेंबरला त्यांनी रोपे लावली आणि आता फुलांची विक्री करीत आहे. या साठी केवळ दहा हजार रूपयांची गुंतवणूक करण्यात आली. हजारीबागमध्ये फुलांचा बाजार चांगला नाही. तरी त्यांची कमाई होत आहे. लोक त्यांच्याकडून फुले विकत घेत आहेत. लग्नसमारंभासाठी वधुवरांचे हार बनविण्याच्या ऑर्डर येत आहेत. 80 लग्नांची ऑर्डर आतापर्यंत आली आहे.
सरकारी योजनांचा लाभ
स्थानिक फुल दुकानदारांसह हजारीबाग मधून लोक फुलांना विकत घेण्यासाठी येत आहेत. भाजीपाल्याची शेती तर सर्वच करतात, परंतू फुलांच्या शेतीची काही मजा औरच आहे. नापिक जमिनीवर आधी काटेरी झुडुपे होती आता फुलांचे मळे फुलले आहेत. अजय म्हणतात त्यांना मोठ्या प्रमाणावर फुलांची शेती करायची आहे. त्यांनी सरकारकडे पॉली हाऊससाठी अर्ज केला आहे. केंद्राच्या प्रधानमंत्री कुंभ योजनेचा लाभ घेतला. यामुळे शेतात केवळ पाच हजार रुपयांत सोलार पॅनल लागला. झारखंड वीज योजनेतून कनेक्शनही घेतले आहे. त्यामुळे रात्रभर शेत चमकत असते.