Bid to preserve the tribal culture & Language : मराठी भाषा दिन हा नुकताच राज्यभर साजरा करण्यात आला. विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. पण आपल्या राज्यात इतर अनेक समाजबांधव आहेत, ज्यांची भाषा मराठी नाही, तर त्यांची स्वत:ची अशी एक भाषा आहे. ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या मातृभाषेवर प्रेम असते, तसेच प्रेम या विविध समाजांचेही आपल्या भाषेवर आहे. यासंबंधीचे व्हिडिओही व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) झाला आहे. आदिवासी बांधवांचा हा व्हिडिओ असून आपली संस्कृतीचे जतन, आपल्या भाषेचे जतन करण्याचा त्यांचा प्रयत्न या व्हिडिओतून दिसून येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यूझर्सना आवडतोय.
एका शाळेतला हा व्हिडिओ आहे. त्यात आपल्याला दिसेल, की एका वर्गात चिमुकले विद्यार्थी दिसत आहेत. त्यांना एक शिक्षक शिकवत आहेत. पण व्हिडिओ पाहून तुमच्या हे लक्षात येणार नाही, की शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना नेमके काय शिकवत आहेत. तर पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या या शिक्षकाने संस्कृतीरक्षणाचा विडा उचलला आहे. आपल्या भाषेची, संस्कृतीची पुढील पिढीला जाणीव करून देण्याचा हा शिक्षक प्रयत्न करत आहे.
गडचिरोली येथील एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना गोंडी भाषा शिकवत आहे. विद्यार्थ्यांना इंग्रजी, हिंदी, मराठी, गणित, विज्ञान आदी विषयही शिकवले जातात. मात्र आपली भाषा ही प्रत्येक मुलाला यायलाच हवी, हा प्रयत्न शिक्षक अत्यंत प्रामाणिकपणे करत असल्याचे येथे दिसून येते.