BMW च्या बोनेटवर झोपून प्रवास, पोलिसांनी अखेर केली वडीलांवर कारवाई
पुण्यातील कल्याणीनगर येथे बिल्डरच्या अल्पवयीन पुत्राने आलिशान कारने दोन इंजिनिअर तरुणांना उडवून ठार केल्याची घटना ताजी आहे. त्यातच कल्याणमध्ये बीएमडब्लू कारच्या बोनेटवर बसून एका तरुणाने केलेल्या स्टंटबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता पोलिसांनी या स्टंटबाज तरुण आणि अल्पवयीन कार चालक आणि त्याच्या पित्यावर वाहतूकीचे नियम न पाळल्या प्रकरणी कारवाई केली आहे.
धनदांडग्यां बापांनी आपल्या अल्पवयीन मुलांना करोडोच्या किंमतीच्या कारच्या चाव्या सोपविल्याने रस्त्यांवर अपघात वाढले आहेत. पुण्याची कल्याणी नगरात एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने महागडी अडीच कोटीची पोर्श कार बेफाम चालवून दोघा अभियंत्याचं जीवन संपविल्याची घटना ताजी असतानाच कल्याणमध्ये काल एका BMW कारच्या बोनेटवर झोपून प्रवास करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित तरुण तसचे अल्पवयीन कारचालक आणि त्याचे वडील या तिघांवर ठाणे शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
पुण्यातील कल्याणी नगरात नंबरप्लेट नसलेली पोर्श कारचा तब्बल 160 किमीच्या वेगाने चालवून मोटारबाईकवरील तरुण आणि तरुणींचा बळी घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणातील अल्पवयीन तरुण बांधकाम व्यावसायिकाचा असल्याने या प्रकरणात त्याला वाचविण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कशी तत्पर झाली होती. याचे किळसवाणे दर्शन जगाला झाले. या प्रकरणात कालच ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांसह शिपायाला रक्ताचे नमूने बदलल्या प्रकरणात अटक झाली. या प्रकरणाची संपूर्ण देशभर चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे अल्पवयीन तरुणांना कार दिल्यास वडीलांवर कारवाई करण्याची कायद्यात तरतूद असताना देखील असे कायदे बिनधास्त पायदळी तुडवला जात आहे. आता कल्याण बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाने बीएमडब्ल्यूच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणातही कार चालविणारा मुलगा अल्पवयीन असल्याचे उघडकीस आले होते.
येथे पाहा ट्वीट –
स्टंटबाजी नेईल थेट तुरुंगात!
वरील दृश्यातील स्टंटबाजी करणाऱ्या इसमास व वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुलास तसेच त्याच्या वडिलांना ठाणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. १/२ pic.twitter.com/JR3RnxlIcX
— महाराष्ट्र पोलीस – Maharashtra Police (@DGPMaharashtra) May 28, 2024
कल्याण पश्चिमेकडील कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालया समोरुन एका बीएमडब्लू कारच्या बोनेटवर एक तरुण आरामात पहुडलेला दिसला. या तरुणाला कारच्या बोनेटवर आरामात झोपलेले पाहताच रस्त्यावरुन चालणाऱ्या पादचाऱ्यांना धक्का बसला. या तरुणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. संबंधित अल्पवयीन कारचालक आणि कारचा मालक असलेले त्याचे वडील आणि कारच्या बोनेटवर झोपलेला तरुण अशा तिघांवर ठाणे शहर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. त्यासंबंधितीची पोस्ट महाराष्ट्र पोलिसांनी ट्वीटरवर पोस्ट केली आहे.