न्यूयॉर्क : सध्या चित्र-विचित्र विक्रम रचण्याचा ट्रेंड आला आहे. प्रत्येकाला काही तरी हटके करुन प्रसिद्ध व्हायचे आहे. यामुळेच
कोण कुठल्या वयात कसला विक्रम करील याचा काही नेम नाही. असा एक विचित्र विक्रम अमेरिकेतील अवललीयाने(US man) केला आहे. विशेष म्हणजे हा विक्रम करण्यासाठी त्याने चक्क नाकाचा वापर केला आहे. शेंगदाणा नाकाच्या साह्याने ढकलून पर्वतशिखरापर्यंत पोहोचवला(moving peanut through nose ) आहे. त्याच्या या अनोख्या करामतीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. एकाखं अपमानास्पद कृत्य केलं तर नाक कापलं असं म्हणतात. मात्र, आता याच नाक घासत या व्यक्तीने नवा विक्रम रचत प्रसिद्धी मिळवली आहे.
बॉब सलेम असं नाकाने विक्रम रचणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. 53 वर्षीय बॉब सलेम हा अमेरिकेचा रहिवासी आहे. कोलोरॅडोमधल्या मॅनिटो स्प्रिंग्ज शहरात तो राहतो. एका अनेख्या विक्रमामुळे बॉब सलेम चर्चेत आला आहे. नाकाच्या साह्याने त्याने एक अनोखा विक्रम केला आहे.
बॉब याने एक शेंगदाणा आपल्या नाकाच्या साह्याने ढकलत हजारो फूट उंचीच्या डोंगराच्या शिखरापर्यंत नेऊन पोहोचवला आहे. त्याच्या अनोख्या विक्रमाची चांगलीच चर्चा आहे. पाइक्स पीक या 14,115 फूट उंचीच्या डोंगरशिखरावर एक शेंगदाणा नाकाच्या साह्याने ढकलत नेण्याचे चॅलेंज बॉबने स्वीकारले होते.
9 जुलैला त्याने आपल्या या अनोख्या विक्रमाचा श्रीगणेशा केला. यानंतर पुढील सात दिवसांत त्याने हे चॅलेंज पूर्ण केले. 15 जुलैला रोजी त्याचा हा विक्रम पूर्ण झाला. यानंतर शहराच्या महापौरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन बॉबचा गौरव करण्यात आला. सिटी ऑफ मॅनिटो स्प्रिंग्ज या शहराच्या अधिकृत फेसबुक पेजवर बॉब याच्या या विक्रमाचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.
याआधी 1976 साली टॉम मिलर यांनी अशा प्रकारचा अनोखा विक्रम केला होता. त्यांनी 5 दिवसांच्या आत शेंगदाणा नाकाच्या साह्याने ढकलून पर्वतशिखरापर्यंत पोहोचवला होता. त्याचप्रमाणे 1929 साली बिल विल्यम्स 22 दिवसांत, तर त्यापुढे काही वर्षांनी अलीसेस बॅक्स्टर यांनी 5 दिवसांत असाच विक्रम केला होता. अशा प्रकारचे विक्रम रचणाऱ्यांच्या यादीत आता बॉबच्या नावाचा देखील समावेश झाला आहे.